पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुलियन बॅरी
सिंड्रोम या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे बघायला मिळतेय. शहरात या आजाराचे १४९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, असे असतानाच ससून रुग्णालयातील पाच रुग्णांनी ‘जीबीएस’वर यशस्वी मात केली आहे. पुष्पगुच्छ देऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार म्हणाले की, ससून रुग्णालयात जीबीएस आजाराचे २८ रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात जीबीएसचे रुग्ण वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, असे असले तरी या आजाराचे पाच रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना आज (शनिवारी) डिस्चार्ज मिळाला आहे. तर येत्या एक ते दोन दिवसांत अजून दहा रुग्णांना डिस्चार्ज मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये, असे पवार म्हणाले.