गडचिरोली : प्रतिनिधी
माओवाद्यांनी रविवारी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात एका ४५ वर्षीय व्यक्तीची हत्या केली. त्याच्यावर पोलिसांचा माहितीदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे, अशी माहिती अधिका-यांनी दिली. ही घटना गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भामरागड तालुक्यातील कियर गावात रविवारी पहाटे घडली, असे अधिका-यांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार, माओवादी ‘निर्दोष नागरिक’ सुखराम मडावी (वय ४५, राहणार कियर गाव) यांचा गळा आवळून हत्या केली. ते पोलिसांसाठी काम करत होते, असा खोटा आरोप माओवाद्यांनी केला, असे एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने सांगितले.
हत्या झालेल्या ठिकाणी सापडलेल्या पत्रकात, माओवाद्यांनी सुखराम मडावी पोलिसांचा माहितीदार असल्याचे खोटे आरोप केले. त्यांनी पोलिसांना पेणुकोंडा परिसरासह नवीन शिबिरे स्थापन करण्यात मदत केल्याचा दावा करण्यात आला आहे.
यंदा माओवाद्यांकडून करण्यात आलेली ही पहिलीच नागरी हत्या असल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.