मेरठ : एका व्यक्तीने ४० हजार रुपयांचे पर्सनल लोन घेवून सुपारी देऊन आपल्या मेहुणीची हत्या करवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने मेहुणीची सुपारी देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करायला लावला. त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली. एवढंच नाही तर नंतर तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळून टाकला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या भावोजीला अटक केली आहे. तर त्याला मदत करणारे इतर दोघे जण सध्या फरार आहेत. ही घटना उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ जानेवारी रोजी मेरठमधील नानू कालव्याजवळ ही हत्या करण्यात आली. आरोपीने त्याच्या २१ वर्षांच्या मेहुणीची हत्या करण्याचा कट रचला आणि सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली. चौकशीमध्ये आरोपीने सांगितले की, त्याचे त्याच्या मेहुणीसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून ती त्याला नेहमी ब्लॅकमेल करत असे. त्यामुळेच त्याने हत्येचा कट रचला. त्यासाठी त्याने शुभम नावाच्या तरुणाशी संपर्क साधला. शुभमने त्याची दीपक नावाच्या व्यक्तीशी भेट घडवून आणली. तसेच दीपक हा हत्येसाठी तयार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघांनीही मिळून हत्येची योजना तयाार केली. त्यासाठी ३० हजार रुपयांची सुपारी ठरली. आरोपी भावोजीने त्यासाठी ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले आणि त्यापैकी १० हजार रुपये अॅडव्हान्समध्ये दिले. तसेच उर्वरित २० हजार रुपये हत्येनंतर देण्याचे ठरले. त्यानंतर २१ जानेवारी रोजी आरोपी भावोजी, शुभम आणि दीपक हे स्कूटीवरून या तरुणीला घेऊन कालव्याजवळ गेले. तिथे त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर गळा आवून तिची हत्या केली आणि ओळख पटू नये म्हणून तिच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून तो जाळून टाकला.
या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी २३ जानेवारी रोजी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान, पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यावर त्यांना एक मृतदेह सापडला. तसेच मृतदेहाजवळ कंडोमची पाकिटं आणि अंतर्वस्त्रे मिळाली. तपासादरम्यान पोलिसांना मृत तरुणी ही शेवटच्या क्षणी तिचे भावोजी आणि शुभम व दीपक यांच्यासोबत दिसली होती, अशी माहिती मिळाली. या संशयाच्या आधारावर पोलिसांनी भावोजीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला.