भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये निवृत्त लष्करी अधिका-याच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माजी लष्करी अधिका-याच्या पत्नीने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. पती डॉक्टरकडे रिपोर्ट दाखवण्यासाठी गेले होते. ते परत आले असता त्यांना पत्नीचा मृतदेह बेसमेंटमध्ये पडलेला दिसला. गेल्या सहा महिन्यांपासून त्या आजारी होती आणि त्यांना नैराशाने ग्रासले होते, अशी माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.
भोपाळच्या टीटी नगरमध्ये राहणा-या या महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली. मात्र महिलेचा मृतदेह बेसमेंटमध्ये पडलेला आढळून आला. पती डॉक्टरांना रिपोर्ट दाखवण्यासाठी गेला होता आणि जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना त्याची पत्नी बेसमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे म्हणत तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, लष्करी अभियांत्रिकी सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी संजय मंगल हे आपल्या ६१ वर्षीय पत्नी अनिता यांच्यासोबत भोपाळच्या तुलसी टॉवरमध्ये राहत होते. अनिता या गेल्या ६ महिन्यांपासून आजारी होत्या. यामुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या. शनिवारी संजय मंगल हे अनिता यांचे रिपोर्ट दाखवण्यासाठी डॉक्टराकडे गेले होते. संजय यांनी परत येऊन दारावरची बेल वाजवली तेव्हा आतून कोणीच प्रतिसाद दिला नाही. संजय यांना वाटले की अनीता या शेजारच्या कोणाच्या तरी घरी गेल्या असाव्यात. त्यामुळे त्यांनी शेजा-यांना अनिता यांच्याबद्दल विचारले. पण अनिता या शेजा-यांच्या घरीही नव्हत्या. यानंतर त्यांनी बेसमेंटमध्ये जाऊन पाहिले तेव्हा त्यांना अनिता यांचाचा मृतदेह दिसला.
रहिवाशांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. संजय मंगल यांना दोन मुली असून त्या बाहेरगावी असतात. त्या भारतात आल्यानंतर अनिता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, संजय मंगल निवृत्तीनंतर भोपाळ मेट्रोमध्ये कामाला लागले होते. तिथे ते तज्ञ म्हणून काम पाहत होते. पत्नीच्या सततच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी तिची काळजी घेण्यासाठी मेट्रोमधील नोकरी सोडली होती.