26.1 C
Latur
Sunday, February 2, 2025
Homeराष्ट्रीयपीडित कुटुंबाला भेटल्यानंतर ढसाढसा रडले सपाचे खासदार

पीडित कुटुंबाला भेटल्यानंतर ढसाढसा रडले सपाचे खासदार

अयोध्येत तरुणीची अत्याचारानंतर निर्घृण हत्या

अयोध्या : अयोध्येत एका २२ मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. बेपत्ता मुलीचा विवस्त्र मृतदेह शनिवारी सापडला, तिची निर्घृण हत्या करण्यात आली, तिचे डोळे काढण्यात आले आणि तिच्या शरीरावर अनेक जखमा करण्यात आल्या. या मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर आता अयोध्येत राजकीय वातावरण देखील तापू लागले आहे. या घटनेनंतर समाजवादी पक्षाचे फैजाबादचे खासदार अवधेश प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र यावेळी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

खासदार अवधेश प्रसाद यांनी रविवारी अयोध्या भागातील एका गावात एका मुलीच्या बलात्कारानंतर झालेल्या हत्येच्या घटनेबाबत एक पत्रकार परिषद घेतली. या घटनेचा निषेध करताना ते ढसाढसा रडू लागले. निर्भया घटनेपेक्षा ही घटना अधिक भीषण असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. लोकसभेचे कामकाज सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरही हा मुद्दा उपस्थित करणार आहे असे अवधेश प्रसाद यांनी म्हटले. सपा खासदाराच्या रडण्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रविवारी सपा खासदार अवधेश प्रसाद यांनी तरुणीच्या हत्येप्रकरणात पीडित कुटुंबाची भेट घेऊन पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेदरम्यान सपा खासदार बराच वेळा रडले. न्याय न मिळाल्यास लोकसभेचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. खासदार अवधेश प्रसाद अचानक रडू लागल्याने लोक थक्क झाले. त्यानंतर सपा नेत्यांनी वारंवार अवधेश प्रसाद यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अवधेश प्रसाद यांचे अश्रू थांबत नव्हते.

मी हा मुद्दा पंतप्रधान मोदींसमोर कोणत्याही परिस्थितीत मांडणार आहे. जर न्याय मिळाला नाही तर मी राजीनामाही देईन. आमच्या मुलीची इज्जत वाचवण्यात आम्ही अपयशी ठरलो आहोत. इतिहास आमच्याबद्दल काय म्हणेल, तुम्हीच विचार करा, ही भारतातील सर्वात वेदनादायक घटना आहे असेही अवधेश प्रसाद म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अयोध्येत एका दलित मुलीवर आधी बलात्कार आणि नंतर तिची हत्या करण्यात आली होती. आरोपींनी विवस्त्र अवस्थेत तरुणीचा मृतदेह नाल्यात फेकून दिला होता. तपासात पीडितेवर अमानुष अत्याचार करण्यात आला, तिचे डोळे फाडून टाकण्यात आले आणि तिचे हात पायावरही जखमा होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR