26.1 C
Latur
Sunday, February 2, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र केसरीला गालबोट

महाराष्ट्र केसरीला गालबोट

पराभवानंतर पै. शिवराज राक्षेचा राग अनावर पंचाना केली मारहाण

अहिल्यानगर : राज्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या अशा महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले आहे. अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना पै. शिवराज राक्षे आणि पै. पृथ्वीराज मोहोळ यांच्यात पार पडला. यावेळी पृथ्वीराज मोहोळने अवघ्या काही सेकंदात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा पराभव केला. या पराभवाने संतापलेल्या शिवराज राक्षेने थेट पंचाची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारली. यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला आहे.

महाराष्ट्र केसरी २०२५ ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ अशी लढत झाली. पृथ्वीराज मोहोळने काही सेकंदात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला अस्मान दाखवले. पण, शिवराजला त्याचा पराभव मान्य झाला नाही. त्याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला. सुरुवातीला त्याचे सहकारी पंचांना बोलायला गेले, यावेळी त्यांची पंचासोबत शाब्दिक बाचाबाची झाली.

यानंतर शिवराज तिथे आला, त्यानेही सुरुवातीला पंचांसोबत हुज्जत घातली आणि शेवटी राग अनावर झाल्याने त्याने आधी पंचांची कॉलर खेचली आणि लाथही मारली. माझी पाठ टेकली नव्हती, असे म्हणत शिवराज राक्षेने पराभव अमान्य केला. या गोंधळानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि शिवराजला दूर केले. या घटनेनंतर शिवराजने व्यासपीठावर खासदार पृथ्वीराज मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलण्याचा प्रयत्न केला. आता या घटनेवर महाराष्ट्र कुस्ती महासंघ काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR