नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासमोर भाजप व कॉँग्रेसचे कडवे आव्हान आहे. दिल्लीच्या निवडणूक आखाड्यात उतरलेल्या महिला उमेदवार या निर्णायक ठरणार आहेत. भाजप आणि आम आदमी पक्षाने प्रत्येकी ९ महिला उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले, तर काँग्रेसने यावेळी ७ महिलांना उमेदवारी दिली आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी सध्या आप नेत्या आतिशी मार्लेना विराजमान आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील एकूण ६९९ उमेदवारांपैकी ९६ महिला आहेत. मागील निवडणुकीपेक्षा यंदा महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. दिल्लीच्या निवडणुकीमध्ये यावेळी महिलांवर लक्ष केंद्रीत करुन प्रचार केला जात आहे. यामध्ये मुख्यमंत्री महिला सन्मान योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे.
सत्ताधारी आम आदमी पक्षाने आतिशी, पूजा बालियान, प्रमिला टोकस आणि राखी बिर्लन यांच्यासह पाच इतर महिला उमेदवारांना तिकीट दिले आहे. भाजपने रेखा गुप्ता, शिखा राय आणि प्रियंका गौतम यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसमधून अलका लांबा, अरिबा खान, रागिनी नायक आणि अरुणा कुमारी या प्रमुख महिला उमेदवार आहेत.
१९९३ च्या निवडणुकीमध्ये १३१६ उमेदवारांच्या यादीत फक्त ५८ महिला होत्या, त्यापैकी फक्त तीन महिला निवडणूक जिंकू शकल्या. त्यानंतर, १९९८ च्या निवडणुकीमध्ये महिला उमेदवारांची संख्या कमी झाली. तर २००३ च्या निवडणुकीत महिलांची संख्या ७८ होती, त्यापैकी फक्त ९ टक्के महिला उमेदवार जिंकू शकल्या होत्या.
२००८ मध्ये भाजपकडून चार महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यापैकी एकही जिंकली नाही. २०१३ मध्येही महिलांना यश मिळाले नाही. २०१५ मध्ये आठ तर २०२० मध्ये ६ महिलांना उमेदवारी दिली होती मात्र त्यापैकी एकही जिंकली नाही. काँग्रेसने २००८ मध्ये, आठ पैकी फक्त तीन महिला जिंकल्या. तर २०१३, २०१५ आणि २०२० मध्ये एकाही महिला उमेदवाराला विजय मिळाला नाही.
‘आप’चा चढता आलेख
आम आदमी पक्षाने महिला उमेदवारांची संख्या सातत्याने वाढवली आहे. त्यांच्या पक्षात महिलांच्या विजयाचे प्रमाण चांगले राहिले आहे. २०१३ मध्ये सहा महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यापैकी तिघांनी विजय मिळवला. तर २०१५ मध्ये सर्व सहा महिला जिंकल्या होत्या. २०२० च्या निवडणुकीत पक्षाच्या ९ पैकी ८ महिला उमेदवारांनी विजय मिळवला.