शिर्डी : प्रतिनिधी
श्रद्धा, सबुरीचा गुरुमंत्र देणा-या साईबाबांच्या शिर्डीत दुहेरी हत्याकांड घडले आहे. एका तासात लागोपाठ तीन ठिकाणी रस्त्यावरुन जाणा-या व्यक्तींवर वार करण्यात आले आहेत. साई संस्थान कर्मचारी सुभाष घोडे आणि साई संस्थानचे कंत्राटी कर्मचारी नितीन शेजूळ या दोघांची भररस्त्यात हत्या करण्यात आली आहे. तर कृष्णा देहरकर यांच्यावर देखील वार झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
सोमवारी पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. एका तासांच्या अंतराने तीन ठिकाणी हे हल्ले करण्यात आले आहेत. पोलिसांनी पहिल्या घटनेची दखल न घेतल्याने तसेच अपघात असल्याचं सांगून गांभीर्यान दखल घेतली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दुचाकीवर दोन जणांनी हा प्रकार केल्याचं उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.
सगळंच फुकट असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली : सुजय विखे
या घटनेनंतर साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी जमली आहे. भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. दोषी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा शब्द सुजय विखे पाटलांकडून देण्यात आला आहे. तसेच शिर्डीत सगळंच मोफत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचं सुजय विखे यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे.