लातूर : प्रतिनिधी
रस्त्याने एकट्या जाणा-या महिलांचे मंगळसूत्र, गंठण हिसकावून नेणा-या चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी मुसक्या आवळल्या. राजू सहदेव जाधव वय २२, रा. याकतपूर, असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ६८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी असा एकूण तीन लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
लातूर जिल्ह्यामध्ये घडणा-या चोरी व मंगळसूत्र हिसकावण्याचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकारी व अंमलदारांचे पथक नेमण्यात आले होते. या पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते.
यादरम्यान पथकाला चोरलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात एक जण असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शहरातील औसा रस्त्यावरील एका पेट्रोल पंपासमोरून राजू सहदेव जाधव यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची सखोल विचारपूस केली असता, त्याने काही महिन्यांपासून शहरातील विविध ठिकाणांहून रस्त्यावरून एकट्या व पायी जाणा-या महिलांचे मंगळसूत्र, गंठण हिसकावून दुचाकीवर पलायन केल्याचे कबूल केले. त्यावरून लातूर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या अभिलेखाची माहिती घेतली असता, पोलिस ठाणे शिवाजीनगर येथे मंगळसूत्रचोरीचे तीन गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले.
जाधव याने तीनही गुन्ह्यांत चोरलेल्या सोन्याची ६८ ग्रॅम वजनाची तीन मंगळसूत्रे, गंठण काढून पोलिसांनी जप्त केले. गुन्ह्यातील दागिने व दुचाकी असा एकूण तीन लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अमलदार राहुल सोनकांबळे, अर्जुन राजपूत, दीनानाथ देवकते, युवराज गिरी, मोहन सुरवसे, राजेश कंचे, विनोद चलवाड तसेच शिवाजीनगरचे पोलिस अंमलदार बालाजी कोतवाड यांनी केली.