22.1 C
Latur
Monday, February 3, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा

महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा

माफी मागा म्हणत फडणवीसांचा राहुल गांधींना सल्ला

मुंबई : लोकसभेत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या सरकारवर टीकास्त्र डागले. यावेळी चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावरुन निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये मोठा फरक आढळून आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीवर राहुल गांधी यांनी संसदेत गंभीर प्रश्न उपस्थित केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान, हिमाचल प्रदेशच्या संपूर्ण लोकसंख्येइतके नवीन मतदार महाराष्ट्रात तयार झाल्याचे राहुल गांधी म्हणाले. पाच महिन्यांत जोडल्या गेलेल्या मतदारांची संख्या गेल्या पाच वर्षांतही नव्हती, असा दावा राहुल गांधींनी केला. यावरुन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे.

महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा! तुम्ही महाराष्ट्रातील तमाम जनतेचा, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि वीर सावरकर यांच्या भूमीचा अपमान केला आहे. तुमच्या पक्षाचा पराभव झाल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील जनतेने एनडीएला दिलेल्या जनादेशावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यानंतर आता आत्मपरीक्षण करण्याऐवजी, तुम्ही निंदा करण्यात गुंतलेले आहात. यासाठी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. त्यामुळे राहुल गांधी माफी मागा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR