मुंबई : प्रतिनिधी
बीडमधील कथित बोगस बिलप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले असून नियोजन विभागाची समिती आठवडाभरात याचा अहवाल सादर करणार आहे. एवढेच नव्हे तर, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची पक्षांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठीदेखील अजित पवार यांनी एक समिती नेमली आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्याच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून विरोधकांनी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना घेरले असतानाच आता बीडमधील काही कामांची चौकशी करण्यात येणार आहे. दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनीच हे आदेश दिले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विकासकामे न करता तब्बल ७३ कोटी रुपये लाटल्याचा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
त्याअनुषंगाने नियोजन विभागाबरोबरच पक्षांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत, धनंजय मुंडे यांनी २०२१ ते २०२२ या काळात कुठलीही विकासकामे न करता ७३ कोटी रुपये लाटल्याचा मुद्दा सुरेश धस यांनी मांडला होता. त्यावर अजित पवार यांनी, तुम्हाला जे म्हणायचे आहे, त्याची लेखी तक्रार करा, असे सांगितले.
या पार्श्वभूमीवर सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले असून नियोजन विभागाची समिती आठवडाभरात याचा अहवाल सादर करणार आहे. एवढेच नव्हे तर, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची पक्षांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठीदेखील अजित पवार यांनी एक समिती नेमली आहे.