मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धाक दाखवण्याच्या नादात स्वत:चे नुकसान करून घेतले आहे. ट्रम्प यांनी अलीकडेच काही देशांवर आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा जगभर प्रभाव पाहायला मिळला. स्वत: अमेरिकन नागरिक या निर्णयावर नाराज आहेत. यानंतर ट्रम्प यांनी हा निर्णय ३० दिवसांसाठी पुढे ढकलला आहे. यानंतर भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी जोरदार उसळी घेतली.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज बेंचमार्क सेन्सेक्स १३९७०.०७ अंकांनी उसळी घेऊन ७८,५८३.८१ वर बंद झाला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ३७८.२ अंकांनी वाढून २३,७३९.२५ वर बंद झाला. वास्तविक, बाजाराने मोठी झेप घेऊनही, सेन्सेक्स आणि निफ्टी अजूनही त्यांच्या विक्रमी उच्च पातळीपेक्षा ११ टक्के खाली आहेत. चीनवर अद्याप आयात शुल्क असून ते लवकरच लागू होणार आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी १% वाढल्याने मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही वाढ झाली.
जवळपास गेल्या महिन्यापासून अस्थीर असलेल्या शेअर बाजारातगुंतवणूकदारांना आज मोठा दिलासा मिळाला. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील ४१९.५ लाख कोटींवरून ४२५ लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. यातून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ५.५ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.
आरबीआयच्या धोरणात्मक निर्णयांवर लक्ष
अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिकोवरील नियोजित टॅरिफला स्थगिती दिल्यानंतर बाजार सुमारे २ टक्के वाढीसह बंद झाला. यामुळे वाढत्या व्यापार तणावापासून तात्पुरता दिलासा मिळाला. ४ फेब्रुवारी रोजी बाजार भांडवलात जोरदार वाढ झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे जागतिक बाजारपेठा अस्थिर आहेत. अशात आता बाजारातील तज्ञांचे लक्ष आरबीआयच्या ७ फेब्रुवारीच्या धोरणात्मक निर्णयावर आहे.
या शेअर्समध्ये चढाओढ
सेन्सेक्समध्ये लार्सन अँड टुब्रो ४.७६%, इंडसइंड बँक ३.५०%, टाटा मोटर्स ३.३८%, रिलायन्स इंडस्ट्रीज ३.२८% आणि अल्ट्राटेक सिमेंट २.७८% सर्वाधिक वाढले. दुसरीकडे सर्वाधिक कोसळणा-या शेअर्समध्ये नेस्ले इंडिया ८.८१%, मारुती सुझुकी इंडिया ०.२३%, टेक महिंद्रा ०.११%, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.०६% यांचा समावेश आहे.