सांगली : या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगरमध्ये पार पडल्या. कुस्ती स्पर्धेतील पंचांच्या निर्णय वादावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी आता आपला महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
दरम्यान, पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पै. पृथ्वीराज मोहोळ यांच्यात मॅटवरील सेमीफायनल मॅच झाली, यावेळी शेवटच्या क्षणी मोहोळ याला विजयी घोषित केले. यावेळी पंचांच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला. यावरुन या स्पर्धेत वाद वाढला. राज्यभरातून या स्पर्धेवर प्रतिक्रिया येत आहेत आता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
पंचांच्या निर्णयामुळे आपल्याला पराभवाला समोर जावं लागलं,त्यामुळे पंच कमिटीने माझ्या पराभवाच्या गोष्टी मान्य केल्या,तर त्याचं मला समाधान वाटेल नसेल तर मी माझ्या डबल महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा,येत्या २ दिवसात कुस्तीगिरी परिषदेला परत देणार असल्याचं पै. चंद्रहार पाटील यांनी जाहीर केले आहे.
शिवराज राक्षे याला पंचांच्या लाथ मारण्याच्या घटनेवरून पंचाला गोळ्या खायला पाहिजे होतं,असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर आता पंच निर्णयावरून चंद्रहार पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
एका डिबेट कार्यक्रमामध्ये काका पवार, संदीप भोंडवे आणि शिवराज राक्षे होते, यावेळी २००९ ला माझा महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सर्व पंच कमिटीने पराभव केला याबद्दल काका पवारांना विचारल्यावर त्यांनी मान्य केले की चंद्रहारवर अन्याय झाला. शिवराज राक्षे हा त्यांचा पठ्ठा, त्याच्यावर अन्याय झाला की ते माध्यमांना सांगत आहेत. पण जेव्हा माझ्या बाबतीत हे घडत असताना तुम्ही तिथे हजर होते.
शरद पवार साहेब हे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. मला हरवल्यानंतर मी आत्महत्येच्या विचारात होतो. आजही मी कोणत्या कुस्तीच्या मैदानामध्ये जात नाही, कारण माझ्या मनामध्ये भीती बसली आहे. एखाद्या पैलवानाची अशी परिस्थिती का होते? असा सवाल करत आपल्या मनातील खदखद चंद्रहार पाटलांनी बोलून दाखवली आहे.
शिवराज राक्षेवर ही परिस्थिती आल्यावर काका पवारांना याचे दु:ख कळाले. आज त्यांनी मान्य केले की माझ्यावर अन्याय झाला होता. तशाच पद्धतीने त्यावेळच्या कुस्तीगीर परिषदेने मान्य करावे की चंद्रहारवर अन्याय झाला आणि त्यावेळेस त्याला हरवण्यात आले.
म्हणजे माझ्या मनाला कुठेतरी समाधान होईल नाहीतर मला या दोन्ही महाराष्ट्र केसरीच्या गदांची गरज नाही. मी जे आजपर्यंत केलं ते प्रामाणिकपणे करून या पदापर्यंत पोहोचलो होतो. अन्याय होऊन मी एखाद्या विशिष्ट विचारापर्यंत गेलो होतो. आयुष्यभर जिवंत आहे तोपर्यंत कुस्तीची सेवा करणार असल्याचे चंद्रहार पाटील यांनी म्हटले आहे.