मुंबई : मुख्यमंत्रीपदावर दुसरी कोणी व्यक्ती टिकू नये यासाठी वर्षा बंगल्या बाहेरच्या लॉनमध्ये खोदकाम करून कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत असे तिथले कर्मचारी सांगतात. त्यामुळेच एवढे दिवस झाले तरी देवेंद्र फडणवीस तिकडे राहायला गेले नाहीत, असा दावा करून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज गोंधळ उडवून दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या थिल्लर चर्चेबद्दल नापसंती व्यक्त करताना, मुलीची दहावीची परीक्षा असल्याने आपण अजून घर बदलले नसल्याचे स्पष्ट केले.
रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन दिवसभर चघळायला नवनवीन विषय देणा-या खा.संजय राऊत यांनी आज वेगळाच दावा करून खळबळ उडवून दिली. देवेंद्र फडणवीस शपथ घेतल्यापासून अजूनही मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले नाहीत. त्यांना कशाची भीती आहे? असा सवाल करताना, वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंग पुरल्याची कुजबुज असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. शपथ घेऊन इतके दिवस झालेतरी फडणवीस का जात नाही आहे. महाराष्ट्रालाही याची चिंता लागून राहिली आहे. शिंदे गटातील सगळे लिंबूसम्राट आहेत.
माझ्या असे कानावर आले व भाजपच्याही गोटात अशी चर्चा आहे की, वर्षा बंगल्या बाहेरच्या लॉनमध्ये खोदकाम करून कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत. हे खरे आहे की खोटं आहे?माहीत नाही. आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत. पण कामाख्या मंदिरात रेडे कटिंग झालं आणि तिथून मंतरलेली शिंग आणली आहेत व ती पुरली आहेत. मुख्यमंत्रिपद दुस-या माणसाकडे टिकू नये असे तिकडला कर्मचारी वर्ग सांगत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. मुख्यमंर्त्यांच्या मनात काय भीती आहे ते का अस्थिर आणि अस्वस्थ आहेत. मुख्यमंत्री काम करतायेत पण ते का अस्थिर आहेत हे महाराष्ट्राला समजायला हवे असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, महात्मा फुले, संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरूद्ध काम करणारे सगळे लोक यांनी अंगारे, धुपारे, चमत्कार, हुंडा याविरोधात काम केलं आहे. पण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये अंधश्रद्धेसंदर्भात प्रचंड चर्चा व्हायला लागल्या आहेत. हे अत्यंत चुकीचे असल्याचे संजय राऊत म्हणाले.
वेड्यांचा बाजार आहे का? : फडणवीस
एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्याच्या संदर्भात सुरु असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचे सांगितले. अलिकडच्या काळात काही बाबतीत प्रसारमाध्यमेही वेड्यांचा बाजार झाले आहेत. आज मी एका वृत्तवाहिनीवर वर्षा बांगला पाडणार अशी बातमी होती. हा काय वेड्यांचा बाजार आहे ? वर्षा ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का? असा उद्विग्न सवाल फडणवीस यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचे आहे. पण त्यापूर्वी त्या ठिकाणी काही छोटी-मोठी कामे सुरु होती. दरम्यानच्या काळातच माझी मुलगी १० वीत आहे. १७ तारखेपासून तीची परीक्षा सुरु होतेय. त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण तिकडे शिफ्ट होऊ. त्यामुळे मी वर्षा निवासस्थानावर सध्या शिफ्ट झालो नाही. मुलीची परीक्षा झाल्यानंतर मी वर्षा या निवासस्थानावर शिप्ट होणार आहे. मात्र, सध्या एवढ्या वेड्यासारख्या चर्चा सुरु आहेत. माझ्या सारख्या माणसांने यावर उत्तरही देऊ नये असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.