28.3 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रमंत्री मुंडेंनी पत्नी करुणा यांच्याविषयी काय माहिती लपवली; खंडपीठात याचिका दाखल

मंत्री मुंडेंनी पत्नी करुणा यांच्याविषयी काय माहिती लपवली; खंडपीठात याचिका दाखल

बीड : प्रतिनिधी
बीडचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एकामागून एक, अशा अडचणींचा डोंगर समोर येत आहे. आता त्यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका दाखल झाली आहे. राजाभाऊ श्रीराम फड यांनी ही याचिका दाखल केली असून, पुढील सुनावणी २० फेब्रुवारीला होणार आहे.

राजभाऊ फड यांच्या निवडणूक याचिकेची दखल न्यायमूर्ती अरुण आर. पेडणेकर यांनी घेतली असून, प्रतिवादीसह मंत्री धनंजय मुंडे आणि इतर उमेदवारांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. २० फेब्रुवारीला होणा-या सुनावणीत नेमके काय होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

निवडणूक याचिकेत मंत्री मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला सादर करावयाच्या प्रतिज्ञापत्रात माहिती दडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंत्री मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात दोन अपत्यांचा उल्लेख केला आहे. मात्र पत्नी करुणा मुंडे यांचा उल्लेख नाही. करुणा मुंडे यांच्या नावावर असलेली वाहने, विमा पॉलिसी, दागिने, फ्लॅट, तसेच बँकेतील इतर जॉईंट आणि न्यायालयातील प्रकरणांची माहिती दडवल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

राजाभाऊ फड यांनी निवडणुकीपूर्वी देखील याचिका दाखल केली होती. परळी मतदारसंघातील २३३ पैकी १२२ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील घोषित करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी शपथपत्र दाखल करून निर्भय वातावरणात आणि लोकशाही मार्गाने निवडणुका घेतल्या जातील, अशी लेखी हमी दिली होती. यावर न्यायालयाने याचिका निकाली काढली होती. धनंजय मुंडे यांच्या दबावापोटी निवडणूक आयोगाने न्यायालयाला दिलेल्या लेखी हमीपत्रानुसार कार्यवाही झाली नाही, असेही याचिकेत म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR