बीड : प्रतिनिधी
माझी मुलगी दहावीत शिकत आहे, असे सांगत १७ तारखेपासून तिची परीक्षा सुरू होत असल्यामुळे परीक्षेनंतर आपण तिथे राहायला जाऊ असे तिनेच सांगितल्यामुळे आपण तूर्तास ‘वर्षा’ निवासस्थानी वास्तव्यास गेलो नाही असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर न जाण्याचे कारण स्पष्ट करत बंगल्यासंदर्भात उठणा-या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीची सत्ता आली. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा शपथविधीसुद्धा झाला. मंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे शपथविधी होऊन प्रत्येकाला शासकीय निवासस्थानेही सुपुर्द करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावेसुद्धा शासकीय निवासस्थान म्हणून ओळख असणा-या ‘वर्षा’ बंगल्याची नोंद करण्यात आली. पण, बरेच दिवस उलटूनही अद्याप मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी वास्तव्यास सुरुवात केलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांपासून समाजाच्या अनेक स्तरांमध्ये याविषयीची चर्चा सुरू झाली.
‘वर्षा’ बंगल्याच्या लॉनमध्ये कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्याची मंतरलेली शिंगे पुरल्याची चर्चा असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आणि पुन्हा एकदा ‘वर्षा’ बंगला आणि त्याभोवती फिरणा-या चर्चांना आणखी वाव मिळाला. त्याच दरम्यान एका माध्यमसमूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजेरी लावली होती. तिथे प्रसारमाध्यमांना सांगत मुख्यमंत्र्यांनीच ‘वर्षा’वर मुक्कामी जाण्यास नेमकी दिरंगाई का होतेय, यासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे देत चर्चांना पूर्णविराम दिला.
बंगल्यावर लहान-मोठी कामे सुरू
‘वर्षा ’ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का? असा प्रतिप्रश्न माध्यमांना केला. माजी मुख्यमंत्र्यांनी हे निवासस्थान सोडल्यानंतर आपण तिथे वास्तव्यास होतो किंबहुना जाणार आहोत. पण, तत्पूर्वी तिथे काही लहान-मोठी कामे सुरू होती असे त्यांनी सांगितले. मुलीची परीक्षा पार पडताच आपण ‘वर्षा’ या निवासस्थानी मुक्कामी जाणार असल्याचे सांगत एकंदरच सुरू असणा-या चर्चा पाहता आपण यावर उत्तरही देऊ नये असे वाटते म्हणत विरोधकांना टोला लगावला आहे.