सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यामधून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आज आयकर विभागाने चौकशी सुरू केली. अजित पवार यांच्या गटामध्ये परत परतणार असल्याचे वृत्त समोर आले होते.
दरम्यान ही छापेमारी झाल्याने जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. संजीवराजे आणि रघुनाथराजे निंबाळकर यांचे निवासस्थान असलेल्या जय व्हिला आणि सरोज व्हिला येथे आज सकाळी ६ वाजता आयकर विभागाची पथके दाखल झाली. या ठिकाणी सकाळपासून संजीवराजे यांची चौकशी आयकर विभागाच्या पथकाकडून करण्यात येत आहे.
रामराजे हे सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत विधान परिषदेचे आमदार आहेत, तर संजीवराजे व रघुनाथराजे यांनी आताच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात प्रवेश केला होता; परंतु सध्या संजीवराजे हे पुन्हा अजितदादांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच आज आयकर विभागाने टाकलेल्या छाप्याने सध्या जिल्ह्यात खळबळ माजली आहे. सध्या संजीवराजे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून, या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
एकाच वेळी पुणे, मुंबई आणि फलटण येथे छापेमारी झाली आहे. बंगल्यामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नसून बाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तर निंबाळकर कुटुंबियांनी कार्यकर्त्यांना गर्दी करू नका असे आवाहन केले आहे. रघुनाथराजे यांचे स्वीय सहायक महेश ढवळे यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली आहे. आयकर विभागातील अधिकारी घरातील सोन्या-चांदीच्या वस्तू कुठून आल्या त्यासोबतच आर्थिक व्यवहारांबाबत विचारणा करत आहेत.