25.5 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री फडणवीसांकडून बीडमध्ये विकासकामांचा शुभारंभ

मुख्यमंत्री फडणवीसांकडून बीडमध्ये विकासकामांचा शुभारंभ

पंकजा मुंडे अन् सुरेश धस एकाच मंचावर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात पोहोचले असून मतदारसंघातील कार्यक्रमस्थळी बीड जिल्ह्यातील नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींची उपस्थिती पाहायला मिळत आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार सुरेश धस आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर आल्याचेही पाहायला मिळाले. व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांचा सत्कार झाल्यानंतर लाभार्थी शेतक-यांना धनादेश वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले. खुंटेफळ धरण क्षेत्रातील बाधित शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यात या धनादेशाद्वारे देण्यात आला आहे. दरम्यान, बीडमधील राजकीय वातावरण तापले असून आज मंत्री पंकजा मुंडे व आमदार सुरेश धस एकाच मंचावर दिसून आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आमदार सुरेश धस यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या खुंटेफळ साठवण प्रकल्प योजनेच्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन बोगदा कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पामुळे आष्टी परिसरातील ३० गावांतील २५ हजार ५४३ हेक्टर क्षेत्र म्हणजे ८० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तिस-या वेळी आमदार असताना आमदार सुरेश धस यांनी ५०० एमसीएफटी पाणी कुकडी प्रकल्पातून मेहेकरीच्या प्रकल्पात आणण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे हे काम मार्गी लागले होते.

२००५ पासून आमदार धस हे उजनी धरणातील अतिरिक्त पाणी बोगद्याच्या माध्यमातून पाईपलाईनने खुंटेफळ साठवण तलावात आणण्यासाठी त्यांचा संकल्प होता. यासंदर्भात बोलताना सुरेश धस यांनी म्हटले की, राज्याचे मुख्यमंत्रिपद तिस-यांदा स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच आष्टी मतदारसंघात जाहीर कार्यक्रमासाठी येत असून आमच्यासाठी हा भाग्याचा क्षण आहे. प्रकल्पामुळे दुष्काळग्रस्त भागात निश्चितच हरितक्रांती घडेल, असा विश्वास सुरेश धस यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून बीड जिल्हा हा राज्याच्या केंद्रस्थानी असून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांच्या घटना उजेडात आल्या आहेत. खंडणीप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले असून त्यांनी थेट धनंजय मुंडे व मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही नाव घेऊन टीका केली होती. त्यामुळे, आजच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे येतील की नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, पंकजा मुंडे, सुरेश धस व मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR