23.4 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्र२ कोटींसाठी अपहरण; बिल्डरच्या मुलाची सुटका

२ कोटींसाठी अपहरण; बिल्डरच्या मुलाची सुटका

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांच्या ७ वर्षीय चेतनचे कारमधून आलेल्या अज्ञातांनी अपहरण केले. अखेर अपहरण झालेला मुलगा सुखरूप सापडला असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. जालना येथील भोकरदन शिवारातून मुलाला ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

अपहरण केलेल्या चेतन तुपेची सुटका २४ तासांच्या आत करण्यात आली आहे. पोलिसांनी मुलांसह अपहरण करणा-यांना ताब्यात घेतले. दोन कोटींच्या खंडणीसाठी काल रात्री आठ वाजता त्याचे अपहरण केले होते. १५ मिनिटांतच सुनील यांच्याशी संपर्क साधून खंडणीची मागणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. मंगळवारी रात्री ८.४५ वाजता एन-४ मध्ये ही घटना घडली.

समोर आलेल्या माहितीनुसार, अपहरण झाल्यानंतर बिल्डर तुपे यांना खंडणीसाठी फोन आला. तात्काळ त्यांनी पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी देखील तपास सुरू केला. अपहरणकर्ते ज्या गाडीत चेतनला घेऊन गेले त्या गाडीचा अपघात भोकरदन तालुक्यात झाला. हा अपघातच पोलिसांसाठी मोठा क्लू ठरला. कारण गाडीचा अपघात झाल्यामुळे अपहरणकर्ते जास्त दूर जाऊ शकले नाहीत. त्यांनी जालन्यात ब्रह्मपुरीजवळ थांबण्याचे ठरवले. या अपघातात ड्रायव्हर जखमी झाल्याने त्याला भोकरदनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

ब्रह्मपुरी गावाजवळ अपहरणकर्ते मुलाला घेऊन शेतात बसल्याचे आढळले त्यावेळीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मुलगा सध्या सुखरूप आहे.
तुपे हे बिल्डर असून त्यांचे भाऊ वरिष्ठ शासकीय अधिकारी आहेत. सुनील कुटुंबासह एन-४ मधील सेक्टर एफ-१ मध्ये राहायला आहे. काल सुनील तुपे दोन मुलांसह सोसायटीत खेळत होते. यावेळी अपहरणाची घटना घडली. कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे निकृष्ट दर्जाचे असल्याने फुटेजमध्ये अपहरणकर्ते कैद झाले नाहीत. कारचा क्रमांकही दिसून आला नाही. सुनील यांचे सासरे राजकीय नेते असून, त्यांचे बांधकामासह विविध व्यवसाय आहेत. पोलिस आयुक्तांच्या देखरेखीखाली ३० पोलिस अधिकारी आणि जवळपास १२० कर्मचारी या घटनेचा तपास करत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR