पुणे : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ लवकरच मंदिर व्यवस्थापन हा अभ्यासक्रम सुरू करणार आहे. विद्यापीठाचा हा ‘मंदिर व्यवस्थापन’ अभ्यासक्रम वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता आहे. या अभ्यासक्रमाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेत युवा पिढी जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी ‘डाटा सायन्स’, ‘नॅनो टेक्नॉलॉजी’, ‘एआय’ असा अभ्यासक्रम घेत देशाला विकासाकडे न्यावे असे म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत राज्य सरकारला विनंती केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘मंदिर व्यवस्थापन’ या विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्याऐवजी कायम दुर्लक्षित ठेवलेल्या पैठण येथील संतपीठाला भरीव निधीच्या माध्यमातून उर्जितावस्था द्यावी आणि त्यांच्या अखत्यारित हा विषय सुरू केला तर, ते अधिक योग्य ठरेल असे रोहित पवार यांचे म्हणणे आहे.
इतर विद्यापीठांनी मात्र आपल्या कार्यकक्षेबाहेरील विषयांत नाक खुपसण्यापेक्षा ढासळणारी गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. युवा पिढी जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी ‘डाटा सायन्स’, ‘नॅनो टेक्नॉलॉजी’, ‘एआय’ यासांरखे बदलत्या तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रम सुरू करून विद्यापीठातून बाहेर पडणारी पिढी ही बेरोजगार न राहता त्यांना नोक-या कशा मिळतील, याचा प्रयत्न करावा.
तसेच विद्यापीठाने आपले काम करताना विज्ञान आणि अध्यात्म याची गल्लत करू नये. राज्य सरकार आणि कुलपती महोदयांनीही यामध्ये लक्ष घालावे, ही विनंती! असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.