मुंबई : प्रतिनिधी
क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. द्वारकानाथ संझगिरी यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. द्वारकानाथ संझगिरी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक क्रिकेट चाहत्यांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
समालोचक हर्षा भोगले यांची पोस्ट
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. हर्षा भोगले आणि द्वारकानाथ संझगिरी हे गेल्या अनेक दशकांपासूनचे मित्र होते. मात्र आपल्या मित्राच्या निधनानंतर हर्षा भोगले यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्याबाबतच्या आठवणी या जगासमोर मांडल्या आहेत.
क्रिकेट आणि सिनेमा
द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रिकेट आणि सिनेमा या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली होती. ‘क्रिकेट कॉकटेल’, ‘क्रिकेटर्स मनातले’, ‘अश्रू आणि षटकार’, ‘अफलातून अवलिये’, ‘फिल्मी कट्टा’ या आणि अशा अनेक पुस्तकांचे लेखन द्वारकानाथ संझगिरी यांनी केले होते. संझगिरी फेसबुकवर सातत्याने क्रिकेट आणि सिनेमा या विषयांवर विस्तृत आणि माहितीपूर्ण लिहायचे.
अन्त्यसंस्कार केव्हा?
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहेत.