मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरीवर फैरी झडत आहेत. अंजली दमानिया यांनी त्यांचे कृषिमंत्री असतानाच्या काळातील घोटाळे बाहेर काढले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र महायुतीचे नेते यावर भाष्य करण्याचे टाळत असल्याचे दिसून येते. यावर माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हे सरकार बेरशरमाचे झाड असल्याचा आरोप करून झणझणीत टीका केली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनात मुंडेंचा सहभाग आहे. या प्रकरणात अटक करण्यात आले असलेले आरोपी त्यांचे सहकारी आणि कार्यकर्ते आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून काढले तर सरकारची इज्जत जाईल, सरकार भ्रष्टाचारी आहे हे सिद्ध होईल या भीतीने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. दमानिया यांनी केलेले आरोप शंभर टक्के खरे आहेत. मी विरोधी पक्षनेता असताना घोटाळा मांडला होता.
एक मंत्री भ्रष्टाचार करण्यासाठी सचिव आणि आयुक्तांच्या बदल्या करतो आणि त्यावर पांघरून घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बदल्यांना मंजुरी दिली होती. धनंजय मुंडेंचा दबाव सरकारवर चालत होता, भ्रष्टाचार करण्यासाठी त्याला एक प्रकारे मोकळीक दिली होती का असे प्रश्न आता उपस्थित होत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
आरोग्याचे पैसे दिले जात नाहीत. गडचिरोलीच्या एका मजुराने आत्महत्या केली. संजय गांधी निराधार योजना, कंत्राटदार, अंगणवाडी सेविका यांचे पैसे दिले जात नाहीत. आता लाडक्या बहिणींना पैसे देताना निकष लावले जात आहेत. उद्या अनेक जाचक अटी घालून बहिणींना पैसे देणेही बंद केले जाईल. लाडक्या बहिणींचा अडीच कोटींपर्यंत गेलेला आकडा पंचवीस ते तीस लाखांवर आणण्याचे प्लॅनिंग सुरू आहे. सरकारचे डोके विकृत झाले असल्याचा थेट आरोप यावेळी वडेट्टीवार यांनी केला.
आमदार फुटणार, महायुतीत सहभागी होणार हा उदय सामंत यांचा दावा खोटा ठरला आहे. जुन्या कढीला ऊत देण्याचा सरकारचा कार्यक्रम सुरू आहे. एक्झिट पोलचे भाकित अनेकदा खोटे ठरले आहे. त्यामुळे दिल्लीतील निवडणुकीतील एक्झिट पोलच्या आकड्यावर विश्वास ठेवू नका अशी सूचनाही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केली.