नाशिक : प्रतिनिधी
शहरातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रेमवीरांसाठी फेब्रुवारी महिना खास मानला जातो. याच महिन्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेमवीरांच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. या ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रियकर प्रेयसीला गुलाब देतात. या गुलाबाच्या पाकळ्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
फूल बाजारातील चित्र बघता यंदा आवक कमी झाल्याने फुलांचा राजा प्रेमवीरांना नाराज करणार असल्याचे चित्र आता दिसते आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. तसेच ‘व्हॅलेंटाईन डे’ अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे.
त्यात राज्यातील विविध शहरांतून, महानगरांतून बीडच्या बाजारात मोठ्या प्रमाणात फुले विक्रीसाठी येतात. त्या फुलांच्या विक्रीतून अनेकांना रोजगार मिळतो. मात्र, बाजारात आलेल्या गुलाबाच्या फुलांना बदलत्या वातावरणात टवटवीत ठेवणे महत्त्वाचे आहे.
नाशिकमध्ये जानोरी मोहाडी, जुन्नर, नगर आदी भागांतून फुलांची आवक होत आहे. आल्यानंतर ती फुले टवटवीत ठेवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना विक्रेत्यांना करावा लागत असल्याचे चित्र दिसत असल्याने दर वाढण्याची शक्यता आहे.
यंदा बाजारात फुलांची आवक झाली कमी
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच नाशिकच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गुलाबांच्या फुलांची आवक होत असते. मात्र, यंदा फुलांचे उत्पादन कमी असल्याने फुलांची आवक कमी होत आहे.
१० रुपयांना मिळेल फूल
बदललेल्या वातावरणात प्रत्येक फुलांना-फळांना टिकवून ठेवणे कठीण होत आहे. यामध्ये फुलांचे उत्पादन देखील कमी झाले आहे. त्यामुळे बाजारात त्यांची आवक कमी झाली आहे. आता ४ ते ५ रुपयांना मिळणारे गुलाबाचे फूल व्हॅलेंटाईन डेला १० रुपयांना १ या दराने मिळेल.