सोलापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील दहा परिसरातील काही घरांमधून पाण्याचे नमुने तपासले. यापैकी सिद्धेश्वर पेठ आणि न्यू पाच्छा पेठेत येथील काही घरांना भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. या भागात पाइप लाइन फुटण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा झाल्याचा अंदाज आहे. मात्र, यातून जीबीएसला निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने खासगी आरओ प्लांटसह टेंकर पाइंटची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. मात्र, ही तपासणी कोण करणार, हा प्रश्न कायम आहे.
शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला घरगुती पाण्याचे नमुने तपासण्याचे आदेश दिले होते. मनपा आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्या नेतृत्वाखाली दहा ठिकाणांहून पाण्याचे नमुने संकलित करण्यात आले. या पाण्याचा अहवाल आला. आठ ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य होते.
सिद्धेश्वर पेठ आणि न्यू पाच्छा पेठेतील काही घरांमधील पाणी काही प्रमाणात दूषित होते. इतर घरांमधील पाणी चांगले होते. दूषित पाणी उकळून न पिल्यास जुलाबाचा त्रास होऊ शकतो, असा निष्कर्ष काढला आहे.महापालिकेचा पाणीपुरवठा विस्कळीत असतो. त्यामुळे लोक खासगी आरओ प्लांटमधील पाणी घेतात. पुणे, मुंबईमध्ये प्रशासनाकडून आरओ प्लांटची तपासणी सुरू आहे. सोलापूर शहरात तपासणी करायचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले होते. पालिकेला हे प्रकल्प तपासणीचे अधिकार नाहीत. जीवन प्राधिकरण, अन्न व औषध प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तपासणी करायला तयार नाहीत.
दूषित पाण्यामुळे जीबीएसचा फैलाव होऊ शकतो. शहरात अनेक ठिकाणी महापालिकेची पाइप लाइन फुटण्याचे प्रकार घडतात. यामध्ये अनेकदा ड्रेनेजचे पाणी मिसळते. रस्त्यावरची माती पाइप लाइनमध्ये जाते. यातून घरातील नळांना दूषित पाणी येते. दूषित पाणी येत असेल, तर पालिकेला कळवा, असे आवाहन आरोग्य अधिका-यांनी केले.महापालिकेची यंत्रणा दररोज २ हजार जणांचे सर्वेक्षण करीत आहे. पाणी उकळून पिण्याचे आवाहन सुरू आहे. पाणी नुमन्यांचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे.असे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी सांगीतले.