मुंबई : प्रतिनिधी
ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यात संपर्क मंत्री देऊन पक्षाने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याचे बोलले जाते. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. गृह विभागाने राजपत्र प्रकाशित करत पुढील आदेशापर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्रिपदावरून ५ फेब्रुवारी रोजी १७ जिल्ह्यांत संपर्क मंत्र्यांची नेमणूक जाहीर केली. विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचे बहुमताने सरकार आल्यानंतर भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी विभागाचे मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे सध्या एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणीही नाही. परिवहन मंत्री या नात्याने शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक हे सध्या एसटी महामंडळाचे अध्यक्षपद भूषवत होते. २०१४ ते २०१९ या काळात परिवहन मंत्र्यांकडेच एसटी महामंडळाचे अध्यक्षपद होते. त्यामुळे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद आपल्याकडे येईल, अशी अपेक्षा प्रताप सरनाईक यांना होती. मात्र देवेंद्र फडणवीसांनी प्रताप सरनाईकांना धक्का देत एसटीच्या अध्यक्षपदी आयएएस अधिका-याची नेमणूक केली आहे.
एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी प्रताप सरनाईक यांनी नुकताच कर्नाटक राज्याचा दौराही केला होता. अलीकडेच प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एसटी महामंडळात नवीन अध्यक्षाची त्वरित नियुक्ती करण्याची विनंती केली होती.
एकनाथ शिंदेंना धक्का
सरकारने आज एक राजपत्र जारी करून अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी असलेले परिवहन सचिव संजय सेठी यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. यासंदर्भात आज गृहविभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. गृहमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांच्या विभागाने संजय सेठी यांची नियुक्ती केल्यामुळे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.