31 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रमहिला आयोग केवळ नेत्यांना पाठिशी घालण्यासाठी

महिला आयोग केवळ नेत्यांना पाठिशी घालण्यासाठी

करुणा मुंडे यांचा रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे सध्या विविध कारणांमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

आता कौटुंबिक प्रकरणांत मुंडे दोषी ठरले आहेत. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने मुंडे यांना झटका देताना त्यांना कौटुंबिक हिंसा प्रकरणात दोषी ठरवले आहे. करूणा मुंडेंना दरमहा २ लाखांची पोटगी देण्याचे आदेशही कौटुंबिक न्यायालयाने दिले आहेत. यानंतर करुणा मुंडे यांनी माध्यमांसमोर धनंजय मुंडे यांच्याविरोधात अनेक आरोप केले असून महिला आयोगासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना करुणा मुंडे म्हणाल्या की राज्यातील महिला आयोग केवळ नेत्यांना पाठिशी घालण्यासाठी आहे. सध्या यामुळे राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली असतानाच करुणा शर्मा यांनी थेट महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

करुणा शर्मा यांना, न्याय मागण्यासाठी महिला आयोगात गेला होतात का? असा सवाल विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना करुणा शर्मा भडकल्या. त्यांनी, कोण महिला आयोग? रुपाली चाकणकर? काय म्हणायचं आहे तुम्हाला? महिला आयोगात केवळ नेते लोकांना पाठिशी घालण्यासाठी आहे. रुपाली चाकणकर यासाठीच तिथे बसल्यात, असा घणाघात केला आहे.

रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाचे अध्यक्ष बनवलय अवघड आहे. मी राष्ट्रीय महिला आयोगात गेले आहे. मी दिल्लीत जाऊन पैसे खर्च करत त्यांना निवेदन दिलेली आहेत. रुपाली चाकणकरांना महिला आयोगातून हटवा, अशी मागणी देखील राष्ट्रीय महिला आयोगाला केल्याचं करुणा शर्मा म्हणाल्या.

अनेक तक्रारी, पण काय केले त्यांनी?
यावेळी करूणा शर्मा यांनी, आयोगाकडे खूप काही तक्रारी असतात. पण आजपर्यंत चाकणकर यांनी काय केले? काहीही नाही. मात्र आता न्यायालयात लढून लढून मला लॉ काय आहे? हे समजायला लागले आहे. जो आरोपी आहे, ज्याच्या विरोधात तुमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्याच्यासोबत तुम्ही फोटोत एकत्रित येऊ नये, असा लॉ आहे. पण रुपालीताईंनी धनंजय मुंडेंची बाजू मांडली आहे. ते आरोपी आहेत ना? माझी मुंडेंच्याबाबत तक्रार आहे रुपालीताईंकडे. खूप तक्रारी आहेत, पण आजपर्यंत चाकणकर यांनी काहीही केलेले नसल्याचा दावा देखील करुणा शर्मा यांनी केला.

आता न्यायालयाने न्याय दिला असून धनंजय मुंडेंना वाटते की, कुठेतरी सेटलमेंट व्हायला पाहिजे. ही आर्थिकरित्या कमजोर झाली तर ही थांबेलही, त्यांना वाटते. तर मी त्यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये होते. हे दाखवण्यासाठी मी सही करावी, असेही त्यांना वाटते. धनंजय मुंडे हे नाव मी हटवावे असे काहीतरी त्यांना हवे आहे. मात्र, ते काही मी काही करणार नाही असेही करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR