मुंबई : प्रतिनिधी
तिजोरीत खडखडाट आणि खर्च वाढल्याने अगोदरच्या काही योजना बंद करायच्या का, यावर मंथन सुरू असतानाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी ३ कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत ७ हप्ते महिलांच्या खात्यात वर्ग झाले आहेत. महिलांना १० हजार ५०० रुपये मिळाले आहेत. राज्य शासनाने या योजनेच्या सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी करण्यासाठी तीन कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.
या अगोदर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी २०० कोटी रुपयांच्या माध्यम आराखड्यास मान्यता दिली होती. त्यानुसार आता योजनेचा सोशल आणि डिजिटल माध्यमात प्रचार, प्रसार करण्यासाठी प्रत्येकी दीड कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या खर्चाला मंजुरी देत महिला व बालविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला.