21.7 C
Latur
Friday, February 7, 2025
Homeमहाराष्ट्रजागा दिली तरी काही लोक डबे, गाड्या बदलतात

जागा दिली तरी काही लोक डबे, गाड्या बदलतात

उद्धव ठाकरेंचा फुटीरांना टोला

मुंबई : सद्याचा जमाना विचित्र असा असून पक्षात येण्याआधीच त्यांच्यासाठी रिझर्व्हेशन हवे असते. रिझर्व्हेशन असेल तरच मी पक्षात येतो अशी काही जणांची भूमिका असते. पण जरा कुठेही खुट्ट झालं की, जागा मिळालेले लोकही डबे आणि गाड्या बदलतात, अशी खंत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

ठाकरे गटाची अधिकृत संघटना असलेल्या रेल कामगार सेनेचे राष्ट्रीय अधिवेशन दादर येथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला उपस्थित कामगार सेनेचे कर्मचारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. रेल कामगार सेना म्हटले की एकच रूळ आहे आणि त्या रुळावरून तुमची वाटचाल सुरू आहे त्याबद्दल मला अभिमान आहे. पण अनेकांना रिझर्व्हेशन दिले असले तरी काही लोकं डबे बदलतात. पण तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या तसा स्वभाव नाही. त्यामुळे ज्यांना उद्दिष्टांचे रूळ नाही ते इकडे तिकडे भरकटत आहेत, असा टोला ठाकरेंनी लगावला.

आपल्या न्याय हक्कासाठी काही आंदोलने करावीच लागतात. पण आम्ही संयमी आहोत याचा अर्थ आम्ही भेदरट आहोत असे नाही, असे ठणकावतानाच ठाकरे म्हणाले, दिल्लीकरांनी एक उफराटा निर्णय घेतला आहे. आपली एक ट्रेन गोरखपूरला घेऊन गेले आहेत. गोरखपुरला दुसरी ट्रेन घेऊन जाण्याबद्दल आमची हरकत नाही, पण आमची हक्काची कोकण ट्रेन जर वळवून तिकडे घेऊन जाणार असाल तर आम्ही पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. देशात इतर ठिकाणी असे घडले आहे का, अहमदाबादची ट्रेन वळवून पाटणाला घेऊन नेली आहे का, असा सवाल करतानाच उलट मुंबईतून जाणा-या सुरतच्या गाड्यांचा मार्ग बंद करायला पाहिजे, कारण त्याचा वाईट अनुभव आम्हाला आहे, असेही ते म्हणाले. पण आपण हे गमतीने म्हटले असल्याचे सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत.

…अन्यथा शिवरायांचा पुतळा आम्ही उभारू!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मुंबईतील टर्मिनसवर महाराजांचा पुतळा कधी उभारणार, असा सवाल करत शिवसेनेच्यावतीने केंद्र सरकारला जाब विचारा असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते जर उभारणार नसतील तर तो पुतळा शिवसेना उभारील, असे ठाकरेंनी स्पष्ट केले. सरकारला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ईव्हीएम मशीन वाटत आहे. महाराजांचा फक्त जय जय करायचा आणि मते घ्यायची. पण महाराजांचा जयजयकार केल्यानंतर ही आपली आदर्श आणि दैवते केवळ मतांसाठी वापरतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

आमिषांना बळी पडू नका!
विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये जाणा-यांची संख्या वाढली आहे. बाहेर जाणा-यांना रोखण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: गुरुवारी गटप्रमुख, शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख पदाधिका-यांशी संवाद साधला. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, भक्कमपणे महापालिका निवडणुकीला सामोरे जाऊ असा विश्वास या पदाधिका-यांना देण्यात आला. दरम्यान, ७ फेब्रुवारीपासून शाखा सर्वेक्षण होणार आहे. त्याअंतर्गत मुंबईतील प्रत्येक शाखेसाठी एक निरीक्षक नेमला जाणार असून हा निरीक्षक शाखेत जाऊन पदाधिकारी आणि गटप्रमुख यांच्याकडून आढावा घेणार आहे. शाखेत पदाधिकारी आहेत की नाहीत कोणती आणि किती पदे रिक्त आहेत याचा संपूर्ण अहवाल हा निरीक्षक येत्या २ ते ३ दिवसांत शिवसेना भवन येथे सादर करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR