मुंबई : इंग्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला. पण या सामन्यात रोहित शर्मा पुन्हा अपयशी ठरला. मॅच जिंकल्यामुळे ६ सामन्यानंतर रोहित शर्माला थोडासा दिलासा मिळाला असला तरी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या तोंडावर रोहित शर्माचा फ्लॉप शो बघून क्रिकेट चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटक-यांनी पुन्हा एकदा रोहित शर्मावर निशाणा साधल्याचे दिसते. सोशल मीडियावर रोहितला ट्रोल करण्याची जणू लाटच उसळल्याचे दिसते.
बॅटिंगसाठी मैदानात आल्यावर रोहित शर्मा तग धरण्याचा प्रयत्न करतोय. पण काही चेंडूचा धनी होऊन तो स्वस्तात माघारी फिरताना दिसतोय. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पुन्हा तेच झाले. तो फक्त २ धावांची भर घालून तंबूत परतला. वनडे मालिकेआधी रोहित शर्मानं रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामनाही खेळला होता तिथंही त्याची डाळ काही शिजली नाही. नागपूरच्या मैदानात तरी तो टोलर्संना उत्तर देईल आणि निवृत्तीच्या चर्चेला पूर्णविराम देईल, असे वाटत होते. पण ते झालेच नाही. तो आला आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या गाणे वाजवून मोकळा झाला. निवृत्तीच्या मुद्यावर रोहित शर्माचा सूर अजून थांबायचे नाही असाच आहे. ते त्याने मॅचआधी बोलूनही दाखवले. पण त्याचा फ्लॉप शो बघितल्यावर मैदानात थांबत नसलेल्या रोहितला संघातच घेऊ नये, अशा अर्थाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
रोहितने लवकरात लवकर निवृत्ती घ्यावी
एका नेटक-यांनी रोहित शर्माच्या फ्लॉप शोचा फोटो शेअर करत रोहित शर्मानं लवकरात लवकर निवृत्ती घ्यावी, असे कुणा कुणाला वाटते? असा प्रश्न उपस्थितीत करत भारतीय कर्णधारावर निशाणा साधला आहे. ना फिटनेस ना इंटेट असे म्हणत एकाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर रोहित शर्माने निवृत्ती घ्यावी, असे मत व्यक्त केल्याचे दिसते.