नाशिक : राज्यात महायुतीला मोठे बहुमत मिळाले आहे. त्याचे राजकीय परिणाम महायुतीतील सहकारी पक्षांना जाणवू लागले आहे. सध्या तरी यामध्ये भाजप सहकारी पक्षांना फारसे महत्त्व देताना दिसत नाही.
नाशिकला भाजपचे गिरीश महाजन तर रायगड जिल्ह्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आदिती तटकरे पालकमंत्री घोषित करण्यात आल्या होत्या. त्यावर शिवसेना शिंदे पक्षाने तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे परदेशात असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या नियुक्त त्यांना स्थगिती द्यावी लागली. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यावर जवळपास महिनाभर सगळ्यांनाच नवे बदल काय होतील, याची उत्सुकता आहे. विशेषत: शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि त्याचे नेते याबाबत खूपच आक्रमक आहेत. नाशिकसाठी दादा भुसे यांच्या नावाचा त्यांचा आग्रह आहे.
रायगड जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत शिवसेना शिंदे पक्षालाच पालकमंत्री पद मिळावे असा देखील आग्रह आहे. त्यासाठी सर्वाधिक आमदार हा त्यांचा निकष आहे. त्यात तडजोड करण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे या समस्येवर काय मार्ग काढायचा हा पेच आहे.