मुंबई : बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याचा एन्काऊंटर करण्यात आला होता. सध्या अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी सुरु आहे. त्यातच काल आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी आम्हाला हा खटला लढायचा नाही, असे सांगितले आहे.
आता यावर कोर्टाने निर्णय दिला आहे. बदलापूर प्रकरणात याचिकाकर्ते अण्णा शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांना कोर्टाकडून तुम्हाला यायचे तर या, आम्ही तुम्हाला बोलवलेले नाही, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.
अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी काल कोर्टात सुनावणी सुरू असताना अक्षय शिंदेची आई अलका अण्णा शिंदे यांनी बोलण्याची परवानगी मागितली. त्यावेळी त्यांनी आम्हाला हा खटला लढायचे नाही, असे सांगितले. अण्णा शिंदे यांनीदेखील हीच मागणी केली. आम्हाला लोकांकडून खूप त्रास दिला जातो. या वयात आता आम्हाला धावपळ शक्य नाही. आमचाही मुलगा गेला असल्याचे त्यांनी सांगितले. यावर आज कोर्टाने भाष्य केले.
तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या. आम्ही तुम्हाला बोलवलेले नाही. तुम्हाला यायचे असेल तर या. नाहीतर यायची गरज नाही असे कोर्टाने बदलापूर एन्काऊंटरप्रकरणी याचिकाकर्ता अण्णा शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांना सांगितले आहे. बदलापूर एन्काऊंटरप्रकरणाची सुनावणी सुरु राहणार आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीला होईल, असे सांगण्यात आले आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्यासमोर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान त्यांनी हे आदेश दिले.
पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीला
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित फेक एन्काऊंटर प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत अक्षय शिंदेची आई अलका आणि वडील अण्णा शिंदे यांनी खटला मागे घेतल्याप्रकरणी भाष्य करण्यात आले. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यावेळी कोर्टाने अक्षय शिंदेच्या आई-वडिलांवर कोर्टात यायचे की नाही हा निर्णय सोपवला आहे.