पुणे : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे मृतांची संख्या ६ वर पोहोचली आहे. ३ नवीन जीबीएस रुग्ण आढळल्याने, पुणे, पिंपरी चिंचवड आणि इतर भागातील रुग्णांची संख्या १७३ वर पोहोचली आहे.
ताप आणि पायांमध्ये अशक्तपणाची तक्रार केल्यानंतर या वृद्ध व्यक्तीला सिंहगड रोड परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे एका आरोग्य अधिका-याने सांगितले. तपासणी केल्यावर असे आढळून आले की रुग्णला जीबी सिंड्रोम आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ५५ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत आणि २१ रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत, तर ७२ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या १७३ प्रकरणांपैकी १२१ पुण्यातील, २२ पिंपरी चिंचवडमधील, २२ पुणे ग्रामीणमधील आणि ८ इतर जिल्ह्यांतील आहेत.
एका अधिका-याने सांगितले की, जीबी सिंड्रोमचे बहुतेक रुग्ण नांदेड गावाजवळील एका गृहनिर्माण संस्थेतून नोंदवले गेले आहेत. येथून पाण्याचा नमुना घेण्यात आला, जो कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे जो पाण्यात आढळतो. नांदेड आणि आसपासच्या परिसरात जीबी सिंड्रोम दूषित पाण्यामुळे होत असल्याची पुष्टी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) केली आहे. पुणे महानगरपालिकेने नांदेड आणि परिसरातील ११ खासगी आरओसह ३३० प्लांट सील केले आहेत.