बीड : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून चांगलाच हल्लाबोल चढवला आहे. धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना कृषिविभागात १६० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. आता पुन्हा एकदा तक्रार दाखल केली आहे.
अंजली दमानिया यांनी एमएआयडीसीच्या एका कराराचे छायाचित्र जोडत मजकूर लिहिला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कृषी घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराचा हा सगळ्यात मोठा पुरावा, असे म्हणत त्यांनी पुढे खरेदीची आकडेवारी नमूद केली आहे. एमएआयडीसी स्वत: बॅटरी पंप २९९० रुपयाने खरेदी करत होते. जीएसटी सकट ते २४५३ रुपयांना पडत होते. मग धनंजय मुंडे यांनी ३४२५ रुपयांना विकत का घेतले? याचे उत्तर मिळालेच पाहिजे, असे अंजली दमानिया यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना कृषिविभागत १६० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला आहे. बाजारभावातील किंमतीपेक्षा अनेक पटीने वाढीव किंमत देऊन नॅनो युरिया, नॅनो डीपीएची खत खरेदी करण्यात आल्याचे अंजली दमानिया यांनी आरोप केला होता.
तसेच नॅनो युरिआ, नॅनो डीएपीसह इतर ५ वस्तुंची खरेदी ६० ते ७० टक्के वाढीव दराने करून धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराडला अटक झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या देखील राजीनाम्याची मागणीने जोर धरला आहे. वाल्मीक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने ही मागणी केली जात आहे. तसेच वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यात आर्थिक व्यवहार देखील असल्याचे अंजली दमानिया यांनी पुराव्यासह माध्यमांसमोर आणले होते. त्यामुळे सर्वच स्तरतून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.