बीड : आका आणि त्यांच्या गँगचा माज अजून संपलेला नाही. अशोक मोहिते प्रकरणातील आरोपी हे कृष्णा आंधारेचे मित्र आहेत. आका आणि त्याच्या सहका-यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
आमदार धस पुढे बोलताना म्हणाले की, दोन महिने झाले तरी कृष्णा आंधळे फरार आहे. तर अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत ते कर्नाटकमध्ये पकडले आहेत. मी अजूनही तेच म्हणतोय की आका आणि त्यांच्या गँगचा माज अजून संपलेला नाही. सुरेश धस पुढे बोलताना म्हणाले की, अशोक मोहिते नावाचा मुलाची तब्बेत नाजूक आहे. त्यामुळे आरोपींवर ३०७ चा गुन्हा दाखल करावा म्हणजे हे आतमध्ये जातील. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला आपल्या कुटुंबाप्रती कोणतीही आस्था नाही. तो करुन करुन काय करणार? कारण त्याचा इतिहासच तसा आहे. त्याला कुणाविषयीही प्रेम नाही. तो निघाला की कुठेही एकटाच निघतो. तसा तो गेलेला आहे.
पण जाऊन जाऊन कुठे जाणार? पोलिस व सीआयडी तपासाच्या बाहेर तो जाऊच शकत नाही. मुळात या प्रकरणातील पुरावे विष्णू चाटे व आकाने नष्ट केल्याची भीती आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड संदर्भातील बातम्यांचे व्हीडीओ का पाहतो? या रागातून अशोक मोहिते यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. या घटनेत अशोक मोहिते हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यात धारूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील मारहाण करणारे वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांना धारूर पोलिसांनी कर्नाटक येथून अटक केली आहे.
प्रचंड संताप होतोय
सुरेश धस म्हणाले की, धनंजय देशमुख यांचा त्रागा रास्त आहे. मी त्यांच्या व महादेव मुंडे यांच्या कुटुंबासोबत आहे. माझे डीवायएसपींशी बोलणे झाले आहे. त्यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले. याशिवाय एसपींनी त्यांना एलसीबीचेही काही सहकारी तपासासाठी दिलेत. महादेव मुंडे यांच्या मारेकरीही लवकर सापडले पाहिजेत. त्याच्या मुलाच्या डोळ्यातील पाणी पाहून माझा प्रचंड संताप होत आहे. त्यामु्ळे त्याला न्याय मिळणे गरजेचे आहे.