31.6 C
Latur
Saturday, February 8, 2025
Homeराष्ट्रीयदिल्लीत २७ वर्षांनंतर फुलतंय ‘कमळ’

दिल्लीत २७ वर्षांनंतर फुलतंय ‘कमळ’

आम आदमी पक्ष पिछाडीवर

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत विधानसभेच्या ७० जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यासाठी मतदानही झाले. त्यानंतर आता या निवडणुकीसाठीची मतमोजणी आज (दि. ८) घेतली जात आहे. सकाळी आठ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यात भाजप ४२ जागांवर आघाडीवर आहे तर आम आदमी पक्षाने २८ जागांची आघाडी घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता राजधानी दिल्लीत तब्बल २७ वर्षांनंतर ‘कमळ’ फुलताना दिसत आहे.

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान झाले होते. मतदानानंतर आम आदमी पार्टी आणि भाजपनेही विजयाचा दावा केला आहे. मात्र, एक्झिट पोलचे अंदाज भाजपच्या बाजूने गेले आहेत. त्यातच आता भाजपने आघाडी घेतल्याचे दिसत असून, यामध्ये बहुमताचा आकडा पार केल्याचे दिसत आहे. तर काँग्रेसला अद्याप एकही जागा जिंकता आली नाही अथवा आघाडी दिसली नाही. दरम्यान, मतमोजणी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. दिल्लीतील ट्रेंडमध्ये भाजप आघाडीवर आहे. दिल्ली सचिवालयातील उच्च अधिका-यांना तात्काळ कार्यालयात पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारी कागदपत्रे आणि डेटा संरक्षित करण्यास सांगितले आहे.

ग्रेटर कैलाश मतदारसंघांत मतमोजणीच्या चौथ्या फेरीनंतर, भाजपच्या शिखा राय ४ हजारांहून अधिक मतांनी पुढे आहेत. आम आदमी पक्षाचे सौरभ भारद्वाज येथे सातत्याने आघाडी राखत होते, परंतु सध्या ते मागे पडले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली असून ‘आप’ पक्षाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. मुस्लिमबहुल मतदारसंघातही भाजपाने आघाडी घेतली आहे. ओखला या मतदारसंघात आजवर भाजपाचा विजय झालेला नव्हता. याठिकाणी भाजपचे मनीष चौधरी आघाडीवर आहेत. तर मुस्तफाबाद येथे भाजपाचे मोहन सिंह बिश्ट आघाडीवर आहेत. हा भाजपचा मोठा विजय मानला जात असून ‘आप’ला धक्का बसला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. येत्या पाच वर्षांत दिल्ली कोणाच्या ताब्यात राहणार हे चित्र दुपारी बारा वाजेपर्यंत स्पष्ट होऊ शकते. बहुतांश एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाची पीछेहाट झाल्याचे दिसून आले असून, भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीत भाजपने आघाडी कायम ठेवली आहे.

भाजप समर्थकांचा जल्लोष सुरू
दरम्यान, भाजप समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. भाजप ४२ जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष २८ जागांवर आघाडीवर आहे. दिल्ली विधानसभेच्या जागेवर भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात जोरदार लढत आहे. दुस-या फेरीत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांना २५४ मतांनी मागे टाकले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR