29.2 C
Latur
Saturday, February 8, 2025
Homeमुख्य बातम्यादिल्लीतील मुस्लिम मतदारांनी ‘आप’च्या झाडूला धूळ चाटवली

दिल्लीतील मुस्लिम मतदारांनी ‘आप’च्या झाडूला धूळ चाटवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाची राजधानी दिल्लीमध्ये भाजपाने २७ वर्षानंतर मोठी मुसंडी मारली. ‘आप’च्या झाडूला धूळ चाटवली. अरविंद केजरीवाल यांचे स्वप्न धुळीस मिळवले. या निवडणुकीत मुस्लिम मतदारांवर आपची मोठी भिस्त होती. मुस्लिम मतदार आपल्या बाजूने वळविण्यासाठी ‘आप’ने अनेक घोषणा केल्या होत्या. तर अवैध रोहिंग्या आणि बांगलादेशांची घुसखोरी दिल्लीत वाढल्याचा आरोप भाजपाने सातत्याने केला होता. वोट बँक पक्की करण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण निकाल पाहता ‘आप’ला मुस्लिम मतदारांनी पण हात दाखवल्याचे चित्र समोर येत आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ चे निकाल सकाळपासूनच हाती यायला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत ७० जागांवर आप, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, एआयएमआयएम आणि इतर पक्षांनी नशीब अजमावलं. दिल्लीत जवळपास १३ टक्के मुस्लिम मतदार आहेत. आतापर्यंत पाच जागांवर मुस्लिम उमेदवार निवडून येण्याची परंपरा आहे. यापूर्वी आपचा वरचष्मा असलेल्या मुस्लिम बहुल भागात यावेळी भाजपाने सुरूंग लावल्याचे दिसून येत आहे.

दिल्लीतील मुस्लिम बहुल भागात सर्वाधिक मतदान झाले होते. त्यामुळे ‘आप’ला आपला विजय निश्चित वाटत होता. पण जे कल आले, त्यात भाजपा आघाडीवर असल्याचे समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला . मुस्तफाबाद, बल्लीमारान, सीलमपुर, मटिया महल, चांदणी चौक आणि ओखला या मतदारसंघात भाजपाचा वरचष्मा दिसत असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यापूर्वीच्या इतर राज्यांच्या निवडणुकीत सुद्धा मुस्लिम मतदार, विशेषत: महिला मतदारांनी भाजपाच्या बाजूने मतदान केल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यापूर्वी या सर्व मतदारसंघात भाजपा सोडून इतर पक्षाचे मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR