नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विरोधकांचा सुपडा साफ करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपने बहुमत मिळवत २७ वर्षांनी पुन्हा दिल्लीची सत्ता मिळवली. मात्र या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा दारुण पराभव झाला. सत्ताधारी आपला २२ जागा मिळाल्या. तर काँग्रेसला एकही जागा मिळवता आलेली नाही. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. दिल्लीत सलग तिस-यांदा दारूण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने चमकदार कामगिरी केली आणि ४८ जागा जिंकल्या. या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचे खातेही उघडले नाही, हा पक्षासाठी मोठा धक्का आहे. मात्र निवडणूक निकालानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांचे आणि दिल्लीकरांचे आभार मानले. दिल्लीचा जनादेश आपण नम्रपणे स्वीकारतो आणि आपला पक्ष राष्ट्रीय राजधानीच्या प्रगतीसाठी आणि दिल्लीकरांच्या हक्कांसाठी लढत राहील, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले.
आम्ही नम्रपणे दिल्लीचा जनादेश स्वीकारतो. राज्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे त्यांच्या समर्पणाबद्दल आणि सर्व मतदारांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल मन:पूर्वक आभार. प्रदूषण, महागाई आणि भ्रष्टाचाराविरुद्ध, दिल्लीच्या प्रगतीसाठी आणि दिल्लीकरांच्या हक्कासाठी हा लढा सुरूच राहील असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
त्याआधी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही दिल्लीतील जनतेचे आभार व्यक्त करताना पराभव स्वीकारला. दिल्ली निवडणुकीत जनतेचा जो निर्णय असेल तो आम्ही पूर्ण नम्रतेने स्वीकारतो. जनतेचा निर्णय सर्वोच्च आहे. या विजयाबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे खूप खूप अभिनंदन करतो आणि जनतेने ज्या अपेक्षा आणि आशेने त्यांना बहुमत दिले आहे त्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल अशी आशा करतो असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
काँग्रेसच्या मतांमध्ये दोन टक्क्यांहून अधिक वाढ
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागांवर काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. मात्र, काँग्रेसच्या मतांमध्ये दोन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. काँग्रेसला सुमारे ६.४ टक्के मते मिळाली आहेत. तर २०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४.२६ टक्के मते मिळाली होती.