नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आम आदमी पक्षाच्या (आप) खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पुन्हा एकदा स्वत:च्या पक्षाविरुद्ध मोर्चा उघडला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्रीपद सोडणा-या आतिशी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावरही स्वाती मालीवाल यांनी निशाणा साधला आहे.
दिल्लीत ‘आप’विरोधात प्रचार केल्याच्या आरोपाबाबत स्वाती मालीवाल यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, मी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही तर जनतेच्या संतापाचा आवाज उठवला. लोक खूप संतापले होते. दिल्लीची स्थिती बिकट झाली आहे, शहर कच-याच्या ढिगा-यात रूपांतरित झाले आहे. अरविंद केजरीवाल आणि आतिशी एसी रूममध्ये पत्रकार परिषदा घेतात, तर मी जमिनीवर काम करते.
आपच्या पराभवाने तुम्ही खूश आहात का? असे विचारले असता स्वाती मालीवाल भावूक झाल्या आणि म्हणाल्या, मला खोटारडी म्हटले गेले, माझ्याविरुद्ध कट रचण्यात आला. एका महिलेवर हिंसाचार झाला आणि देवाने त्यांना त्याची शिक्षा दिली आहे. याचबरोबर, स्वाती मालीवाल यांनी आप पक्ष सोडण्याबाबत स्पष्ट नकार दर्शविला. त्या म्हणाल्या की, मी आपला १२ वर्षे दिली आहेत. आप पक्ष म्हणजे केवळ अरविंद केजरीवाल यांची संपत्ती नाही.