26.9 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमुख्य बातम्यापंजाबात होणार खेला? भगवंत मान यांचे शिंदेंच्या पावलावर पाऊल..!

पंजाबात होणार खेला? भगवंत मान यांचे शिंदेंच्या पावलावर पाऊल..!

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंजाबमधील काँग्रेस नेते प्रतापसिंह बाजवा यांनी पंजाबात देखील ‘खेला’ होणार असल्यासंबंधीचे काही दावे केले आहेत. मुख्यमंत्री भगवंत सिंग मान नजिकच्या भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता पंजाबमध्ये आम आदमी पक्षात मोठी उलथापालथ होऊ शकते, असा दावा बाजवा यांनी केला.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आम आदमी पक्षात मोठी बंडखोरी करू शकतात. पंजाबमधील ३० हून अधिक आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत, आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार असल्याचेही बाजवा यांचे म्हणणे आहे.

दिल्लीतील पराभवानंतर पंजाबमधील भगवंत मान सरकार टिकणे कठीण आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आधीच दोन गटांमध्ये विभागला आहे. पंजाबमधील आम आदमी पक्ष दिल्लीच्या नेतृत्वाशी चांगला ताळमेळ ठेवण्यास सक्षम नाही. आता दिल्लीतील पराभवामुळे ‘आप’चे दिल्लीतील नेतृत्व पंजाबवर जास्त लक्ष केंद्रीत करेल. पण हे मुख्यमंत्री भगवंत मान सहन करणार नाहीत. त्यामुळे आम आदमी पक्षात नेतृत्वासाठी संघर्ष होईल आणि फूट पडेल. पंजाब ‘आप’ आणि दिल्ली ‘आप’ यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरु आहे. मुख्यमंत्री भगवंतसिंग मान हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात आहेत, असे बाजवा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये २०२२ च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला. ११७ जागा असलेल्या पंजाब विधानसभेत आम आदमी पक्षाने ९२ जागा जिंकल्या होत्या. मुख्यमंत्री भगवंतसिंग मान सरकारला कोणताही धोका नसल्याचे दिसत आहे. असे असले तरी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम आदमी पक्षावर काँग्रेस नेत्यांनी टीका केली असून, अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR