पुणे :
पुण्याच्या भोसरी एमआयडीसीतील जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांनी मुंबईबाहेर जाण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. चौधरी यांना कामानिमित्त पुणे येथे जायचे असून मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश राहुल रोकडे यांनी त्यास सशर्त परवानगी दिली आहे.
भोसरी एमआयडीसीतील भूखंड अल्प दरात खरेदी केल्याच्या आरोपावरून एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी तसेच जावई गिरीश चौधरी व अन्य काही जणांविरुद्ध ईडीने कारवाई केली होती.
एकनाथ खडसे यांच्यासह इतर आरोपींना कोर्टाने अटी-शर्तींसह जामीन दिला असून खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुणे येथे जाण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून मुंबई सत्र न्यायालयात अॅड. मोहन टेकवडे यांच्यामार्फत अर्ज केला.
या अर्जावर आज अतिरिक्त न्यायाधीश आर. एन. रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्या वेळी चौधरी यांना कामानिमित्त पुणे येथे जायचे असून न्यायालयाने त्यास परवानगी द्यावी, अशी मागणी अॅड. टेकवडे व अॅड. काजोल म्हात्रे यांनी न्यायालयाकडे केली.
तसेच काही कागदपत्रे आणण्यासाठी चौधरी यांना त्यांच्या गावी जळगाव येथे जाण्याची परवानगीही देण्याची विनंती वकिलांनी केली. पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी त्यांचा हा अर्ज मंजूर केला.
हा अर्ज मंजूर करतानाच मुंबईबाहेर जाण्यापूर्वी एक लाख रुपये कोर्टात हमी म्हणून जमा करावेत, जामिनाच्या अटी-शर्ती पाळाव्यात तसेच १२ डिसेंबर रोजी कोर्टात हजर राहावे अशा अटी घातल्या.