अबुजा : आफ्रिकन देश नायजेरियातील एका गावात लष्कराने चुकून केलेल्या ड्रोन हल्ल्यात ८५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नायजेरियाच्या स्थानिक अधिकाऱ्यांसह लष्कराशी संबंधित लोकांनी उत्तर-पश्चिम नायजेरियातील एका गावावर ड्रोनने हल्ला केल्याची माहिती दिली. नायजेरियातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघाती ड्रोन हल्ल्यात किमान ८५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६० हुन अधिक नागरिक जखमी झाले आहेत. नायजेरियन आर्मीच्या या ड्रोनचे लक्ष्य अतिरेकी होते पण ते चुकून कडुना राज्यातील एका गावात कोसळले.
नायजेरियाच्या नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने सांगितले की, रविवारी मुस्लिम सण साजरा करण्यासाठी लोक जमले असताना हा अपघात झाला. या अपघातात बचावलेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इस्लामिक अतिरेकी आणि गुन्हेगारी टोळ्यांविरुद्धच्या लढाईत नायजेरियन सैन्य अनेकदा ड्रोन हल्ले करतात. देशाचा वायव्य प्रदेश हा इस्लामिक अतिरेकी आणि गुन्हेगारी टोळ्यांचा दहशतीखाली आहे.
कडुना राज्याचे गव्हर्नर उबा सानी यांनी या घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. तसेच जखमींना राज्याची राजधानी कडुना येथील प्रशिक्षण रुग्णालयात नेण्यात आले, असे स्थानिक राज्य सुरक्षा आयुक्त सॅम्युअल अरुवान यांनी लष्करी अधिकारी आणि समुदाय नेत्यांच्या बैठकीनंतर सांगितले. मिलिशिया टोळीतील लोक स्थानिक पातळीवर डाकू म्हणून ओळखले जातात. वायव्य नायजेरियाच्या काही भागांवर दीर्घकाळापासून त्यांची दहशत आहे. ते रहिवाशांना लुटतात आणि खंडणीसाठी त्यांचे अपहरण केले जाते. यामुळे २००९ पासून आतापर्यंत ४० हजाराहून हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि २० लाख लोक विस्थापित झाले आहेत.