छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. तर सत्ताधारी आम आदमी पार्टीची पीछेहाट झाली. पण भाजपाच्या या विजयावर आता विरोधकांडून टीका होत असल्याचे बघायला मिळतेय. असे असतानाच आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, दिल्लीच्या निकालात मतांची चोरी झाली की दरोडेखोरी हे तपासले पाहिजे. आमचं म्हणणं आहे व्हीव्हीपॅट द्या. पण भाजपा हे मान्य करत नसेल तर दाल में कुछ तो काला है. जर व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठीवर आमची सही करून किंवा शिक्का मारून ती आमच्या हाताने बॉक्समध्ये टाकण्याची परवानगी मिळावी, तर मग आम्ही भाजपाच्या विजयाला सलाम ठोकू. माझे मत पडले की नाही, हेच निवडणूक आयोग दाखवू शकत नाही. आम्ही सोन्याची चोरी बघितली. पण मतांची चोरी आज पहिल्यांदाच बघतोय. त्यामुळे दिल्लीचा विजय हा ईव्हीएमचाच विजय आहे.
धर्माच्या नावावर राजकारण सुरू
महाराष्ट्रात जे चित्र होते, तेच दिल्लीमध्येही बघायला मिळत आहे. काही वर्षांपूर्वी भाजपाची मागणी होती की ईव्हीएम मशीन बंद करा. मात्र, आता मशीन चांगली कशी झाली? एकतर व्हीव्हीपॅट मशिन हाती घेतली पाहिजे, नाहीतर त्या ईव्हीएम मशिन नागरिकांनी फोडून टाकल्या पाहिजेत. त्यांच्याकडून केवळ धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे, असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला.