मुंबई : दिल्लीत आप व काँग्रेस दोघेही एकमेकांना संपवायलाच लढले. त्यात मोदी-शहांचे फावले. हे असेच चालणार असेल तर आघाड्या वगैरे निर्माण करायच्याच कशाला? मनसोक्त भांडा! महाराष्ट्रानंतर दिल्लीच्या निकालाने कोणी बोध घेणार नसतील तर हुकूमशहाच्या विजयाला हातभार लावणार आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेने सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.
दिल्ली विधानसभेत स्वत: अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. ७० आमदारांची संख्या असलेल्या विधानसभेत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला २२ जागा, तर भाजपने ४८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. काँग्रेसला प्रथेप्रमाणे भोपळाही फोडता आला नाही. २७ वर्षांनंतर भाजपला दिल्लीत विजय मिळाला. केजरीवाल यांच्यासह आपचे संपूर्ण मंत्रिमंडळ पराभूत झाले. अपवाद फक्त मावळत्या मुख्यमंत्री आतिशी व गोपाल राय यांचा. केजरीवाल यांनी राजकारणात जेथून सुरुवात केली तेथेच ते पुन्हा पोहोचले आहेत.
केजरीवाल यांच्या पराभवावर आणि भाजपच्या विजयावर विश्लेषणाचा वर्षाव सुरू आहे, पण जग जिंकल्याच्या थाटात मोदी व त्यांच्या लोकांनी दिल्लीचा विजयोत्सव साजरा केला. दिल्लीतील निकालासंदर्भात दोन प्रतिक्रिया लक्षवेधी आहेत. पहिली जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची व दुसरी अण्णा हजारे यांची. राळेगणच्या अण्णा हजारे यांना महात्मा अण्णा बनविण्यात केजरीवाल व त्यांच्या लोकांचा मोठा वाटा आहे.