29.7 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्र‘आता बोलू नका, आपले काम सुरु आहे’

‘आता बोलू नका, आपले काम सुरु आहे’

ऑपरेशन टायगरबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

मुंबई : २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा दारूण पराभव झाला. यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाने मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापण्यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. परंतु, ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असून पक्षातील गळती थांबताना दिसत नाही. अगदी अलीकडेच परभणी, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कल्याण, ठाणे, भिवंडी येथील कार्यकर्ते, पदाधिका-यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता कोकणचा नंबर असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केले आहे.

अलीकडेच शिंदे गटाच्या नेत्यांनी ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन धनुष्यबाण राबवणार असून ठाकरे गटाचे आमदार, खासदार शिंदेसेनेच्या संपर्कात असून, लवकरच त्याबाबत निर्णय होणार असल्याचा दावा केला. परंतु, गेल्या काही दिवसांतच राज्यातील बहुतांश भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला लागत असलेली गळती उद्धव ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरू शकते असे सांगितले जात आहे. पक्षातील इन्कमिंगबाबत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.

महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे काही खासदार फुटणार असल्याचा दावा महायुतीचे नेते आणि शिंदे गटातील पदाधिकारी करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते भेटले. एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू पदाधिका-यांपैकी एकाने आता ट्रेलर सुरू आहे पिक्चर बाकी आहे असे सांगितले. यावर बोलताना, ते आता बोलू नका, आपले काम सुरू आहे. आम्हाला फोडाफोडी करून काय करायचे आहे, मी कधीही फोडाफोडी करत नाही. जे येत आहेत ते आपोआप येत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, आनंद दिघे साहेबांवरील चित्रपट सुपरहीट झाला. आपला विधानसभेचा पिक्चरही सुपरहीट झाला. आता तिसरा सिनेमा आपल्याला काढायचा आहे. आता कोणता? त्याचे नाव काय? याची मला माहिती नाही. पण तो देखील सुपरहीट होणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR