30.3 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeलातूरसामान्य लोकांमध्येच असामान्यत्व दडलेले असते

सामान्य लोकांमध्येच असामान्यत्व दडलेले असते

लातूर : प्रतिनिधी
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी व्यक्तीमत्त्व अत्यंत महत्त्वाचे असते. व्यक्तिमत्व म्हणजे जसे दिसता तसे नाही तर अभ्यास, कठीण प्रसंगाला कसे सामोरे जाता आणि समाजात कसे वावरता यावर  अवलंबून असते, यासाठी सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहिले तरी पुरेसे आहे. ज्ञान, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास असने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड अभ्यास करावा. खचून न जाता प्रसंगाला सामोरे जा, कारण सामान्य लोकांमध्येच असामान्यत्व दडलेले असते, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे यांनी केले.
येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या ‘समता पर्व:वार्षिक स्नेहसंमेलन २०२५’ समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे बोलत होत्या.  अध्यक्षस्थानी शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख होते. यावेळी प्रशिक्षणार्थी आय. पी. एस अधिकारी सागर खर्डे यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘वडील अल्प भूधारक शेतकरी, ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षण असा खडतर प्रवास करत ध्येय आणि जिद्द उराशी बाळगून प्रचंड अभ्यास करत आयपीएस पदापर्यंत पोहोचण्याचा संघर्ष प्रवास मांडला. एक शेतकरी बापाचा मुलगा आय.पी.एस अधिकारी होऊ शकतो, तर तुम्ही का होऊ शकत नाहीत. असे स्वत:चे उदाहरण देत ते पुढे म्हणाले, शेतक-याच्या विद्यार्थ्यांने प्रचंड अभ्यास केला पाहिजे, आत्मविश्वास अंगीकारला पाहिजे, समाजमाध्यमांचा उपयोग कमी करून तो वेळ शिक्षणासाठी द्यावा.
उदिष्टपूर्तीसाठी आपण अहोरात्र अभ्यास करावा आणि आपल्या आई-वडिलांना आनंद द्यावा. असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना याप्रसंगी केले. मंचावर संस्थेचे सहसचिव गोपाल शिंदे, अ‍ॅड. सुनील सोनवणे, सदस्य आनंद माने, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्रचार्य, प्रा. सदाशिव शिंदे, डॉ. अभिजीत यादव, डॉ. ओमप्रकाश शहापूरकर, प्रा. डॉ. संभाजी पाटील, प्रा. डॉ. दीपक वेदपाठक, डॉ. अनिरुद्ध बिराजदार, राष्­ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. कल्­याण सावंत, डॉ. महेश वावरे, विद्यार्थी परिषदेचे सचिव आयेशा बेग व विद्यार्थी परिस्थितीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. पी. आर देशमुख म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नेहमी थोरामोठ्यांच्या विचारांच्या कृतीचे पालन करावे आणि आपले ध्येय पूर्णत्वास न्यावे. प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी केले.२०२४-२५ च्या ‘शाहू श्री’ पुरस्काराची घोषणा केली. हा मानाचा पुरस्कार विभागून प्राची मोरे आणि नागेश कांबळे या गुणवंत विद्यार्थ्यांना जाहीर झाला. ‘हा पुरस्कार महाविद्यालयाच्या एकूण विद्यार्थ्यांमधून एका अष्टपैलू विद्यार्थ्याला दिला जातो. ज्या विद्यार्थ्यांच्या अंतरंगात ज्ञान, नम्रता आणि महाविद्यालयाबद्दल असलेली आस्था आहे. तो महाविद्यालयातील विविध उपक्रमात नेतृत्व करत असतो अशा गुणी विद्यार्थ्यांची पारख करून समितीमार्फत या पुरस्कारासाठी निवड केली जाते. सर्व उपस्थितांचे आभार डॉ. संभाजी पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. सूर्यकांत चव्हाण व प्रा. सुदर्शन पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनींची मोठ्या संखेने उपस्थित होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR