नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं आहे. आता राजधानीत मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे. दरम्यान, पुढील मुख्यमंत्री म्हणून भाजप महिला आमदाराला मुख्यमंत्रिपद देऊ शकते.
यावेळी भाजप दिल्लीत उपमुख्यमंत्री देखील बनवू शकते. गेल्या काही निवडणुकांनंतरही भाजपमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची संकल्पना दिसून येत आहे. मंत्रिमंडळात महिला आणि दलितांचाही समावेश असेल असे सांगण्यात येत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दोन तृतीयांश बहुमत मिळवले आहे. दहा वर्षानंतर ‘आप’ने सत्ता गमावली. या विजयासह, आता दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल ही चर्चा सुरू आहे. भाजपामध्येही बैठकांचे सत्र सुरु आहे. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून निर्णय घेण्यासाठी चर्चा सुरू आहेत.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून भाजपला मोठा विजय मिळवून दिला. निकालाच्या दिवसापासूनच त्यांचे नाव चर्चेत आहे. ज्येष्ठ भाजप नेते विजेंदर गुप्ता तसेच सतीश उपाध्याय यांचेही नाव चर्चेत आहे.