पुणे : तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरण नाट्यावरून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. मुलगा घरातून भांडण करून निघून गेला अशा वेळी केवळ त्या मुलाला अडवायचे असल्याने सर्व पोलिस यंत्रणा कामाला लावणे गरजेचे होते का? असा प्रश्न त्यांनी सावंत यांना केला आहे.
तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून गायब झाल्यानंतर तयार झालेल्या अपहरण नाट्यावर अखेर पडदा पडला होता. तो बँकॉकसाठी चार्टर विमानाने निघाला असल्याची माहिती समोर आली होती. मात्र पोलिसांनी तपासची चक्रे फिरवल्यानंतर हे विमान पुणे विमानतळावर दाखल झाले. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज यांच्यासोबत त्याचे दोन मित्र देखील होते. यादरम्यान ऋषीराज सावंत यांनी जवळपास ६८ लाख रुपये खर्च केल्याचे समजते. यावरुन आता सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला आहे.
आव्हाड यांच्याकडून अधिवेशनाची आठवण
या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही टीका केली. या संदर्भात आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, ‘कोण आहे हा हाफकिन? माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज शेठ हा नाराज झाला आणि थेट प्रायव्हेट चार्टर प्लेन घेऊन बँकॉक ला फिरायला चालला होता. इकडे माननीय माजी मंत्री यांनी किडनॅपिंगची केस दाखल केली आणि ते प्लेन चेन्नई येथे उतरवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. बरं काही दिवसांपूर्वी मंत्रीपद न मिळाल्याने माननीय तानाजी सावंत साहेब अशाच प्रकारे नागपूरच्या अधिवेशनातून नाराज होऊन बॅगा भरुन निघून गेले होते बरं का….’
काय होते प्रकरण?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बडे नेते तथा माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाल्याचा दावा केला जात होता. ऋषिकेश सावंत हे पुणे विमानतळ परिसरातून बेपत्ता झाले. त्यांचे पांढ-या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून आलेल्या ४ जणांनी अपहरण केल्याचे सांगितले जात होते. पुणे पोलिसांनी घटना स्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर घटनेचा तपास सुरू केला.
तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया
तानाजी सावंत यावर बोलताना म्हणाले, हे बेपत्ता आहे की अपहरण याबद्दल आम्हाला नेमके माहित नाही. त्याच्यासोबत जे होते ते त्याचे मित्र होते, त्याच्या गाडीतून जाण्याच्या ऐवजी त्याच्या मित्राच्या गाडीतून तो गेला. तसेच कुठे जात आहे याची माहिती मला नसल्याने मी काळजीमुळे लगेच पोलिसांना याबद्दल माहिती दिली आहे. फोन केल्याशिवाय तो कुठे जात नाही, मात्र आज तसे झाले नाही म्हणून मी पोलिसांत तक्रार दिली. तसेच याबद्दल मला माहिती आमच्या चालकाकडून मिळाली की मी त्यांना विमानतळावर सोडून आलो. पण मला याची कल्पना नव्हती म्हणून मी पोलिसांशी संपर्क साधला.