नागपूर : राज्यातील राजकारणात येत्या दोन महिन्यांत मोठे बदल होणार आहेत. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जवळीक वाढत आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांना बाजूला केले जात आहे. भाजपने त्यांचा वापर केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज दिसत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरु केलेल्या ज्या योजना होत्या त्या आता बंद केल्या जात आहेत. अजित पवार यांना जवळ घेऊन एकनाथ शिंदे यांना दूर करण्याची देवेंद्र फडणवीस यांची रणनीती दिसत आहे, असे राजकीय विश्लेषण समाजसेविका अंजली दमानिया यांनी केले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात बोलताना अंजिल दमानिया म्हणाल्या, मी सीसीटीव्ही फुटेज पाहिलेले आहेत. तीन महिने जुने हे सीसीटीव्ही फुटेज दिसत आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी गाडीतून उतरून पळून जात आहेत. पुढे पोलिसांचा फौजफाटा आहे. नाकाबंदी आहे. त्यामुळे आरोपींना पळून जाण्यासाठी पोलिसांनी टीप तर दिली नाही ना? असा संशय निर्माण होत असल्याचे दमानिया यांनी म्हटले.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार
संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांवर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात मी अनेक पुरावे दिले आहेत. आता आज होणा-या मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडे यांच्या चौकशीची घोषणा करून त्यांचा राजीनामा होतील, अशी मला अपेक्षा आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.