सोलापूर : एस .टी. बसने प्रवास करत असताना अधिकृत थांब्यावर चहा – नाष्ट्याचे दर ठरविण्यात आले आहेत. अधिकचे पैसे कोणी मोजत असल्यास तक्रार करता येते, एसटीने प्रवास करताना खासगी हॉटेल्सवर बस थांबली तरी त्यांचे महाग जेवण पाहून अनेकदा प्रवासी काही खाणे टाळतात. खासगी हॉटेल चालकांकडून प्रवाशांची होणारी ही लूट थांबविण्यासाठी एसटी महामंडळाने पाऊल उचलले होते.
एसटी महामंडळाने ‘३० रुपयांत चहा-नाष्टा’ योजना आणली आहे. मात्र, महामंडळाच्या या निर्णयाची प्रवाशांना कोणतीच कल्पना नसल्याने प्रवासी हे हॉटेल चालक मागेल तेवढे पैसे देऊन चहा, नाष्टा व जेवण करीत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ३० रुपयांच्या चहा – नाष्ट्याची सोय ही लांब पल्ल्यातील प्रवासासाठी केली जाते. यामध्ये महामंडळाकडून हॉटेलसोबत करार केला जातो. त्या अधिकृत थांब्यामध्येच प्रवाशांना ३० रुपयांमध्ये चहा नाष्टा देण्याचे आदेश असतात. परंतु, बहुतांश ठिकाणी प्रवाशांना चहा – नाष्टा महाग दिला जात असल्याने प्रवाशांना भुर्दंड बसतो.
एसटी महामंडळाच्या प्रवाशांना अधिकृत थांब्यावर केवळ ३० रुपयांत चहा नाष्टा देण्याचे आदेश आहेत. एसटीच्या प्रवाशांना शिरा, पोहे, उपमा, वडापाव, इडली, यापैकी एक पदार्थ आणि एक कप चहा ३० रुपयांत देण्याचे एसटी महामंडळाचे आदेश आहेत. एखाद्या हॉटेल चालकाने प्रवाशांकडून जास्तीचे पैसे घेतले असतील तर त्याची तक्रार विभागीय कार्यालयाकडे करता येते. आगारातील सोलापूर जिल्ह्यातील बसमधील प्रवाशांसाठी कुठे अधिकृत थांबा आहे, याबाबतची माहिती प्रसारित, जनजागृती, प्रचार, प्रसार न केल्याने प्रवाशांना माहीत नाही. त्यामुळे तक्रारी येण्याचा विषयच नाही.
सोलापूर जिल्ह्यातील सर्वच आगारांकडून काही अधिकृत हॉटेल ठरविण्यात आली होती. तेथेच बस थांबत होती व प्रवाशांना ३० रुपयांचा चहा-नाष्टा दिला जात होता. नाष्टा किवा जेवणासाठी बस ज्या हॉटेलवर थांबली आहे, त्या हॉटेलचे नाव व त्या मालकाचे नाव सांगून एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालया येथे ०२२-२३०७५५३९ वर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.