जिंतूर : जिंतूर येथून ८० प्रवासी घेऊन एस.टी. महामंडळाची बस कावीकडे निघाली होती. रस्त्यात शेवडीच्या पुढे भोसी रस्त्यावरील चढ चढत असताना बस अचानक मागे येण्यास सुरूवात झाली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी चालत्या बसच्या दारातून उडया मारल्या. या घटनेत काही प्रवाशांना किरकोळ मार लागला. याचवेळी पाठीमागून येणा-या बस चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना दि.१० फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर आगाराची बस क्रमांक एम.एच. २० बी.एल. ०५८८ ही ८० प्रवासी घेऊन कावीकडे जात होती. शेवडी पाटी ओलांडल्यानंतर भोसीकडे जाण्यासाठी चढ चढावा लागतो. या चढावर बस चढत असताना अचानक बस मागे यायला लागली. त्यामुळे घाबरून काही प्रवाशांनी चालत्या बस मधून खाली उडया मारल्या. यावेळी बस चालकाने ब्रेक मारून बस थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु बस न थांबता जिंतूर ते सावरगावकडे जाणा-या एम.एच. १४ बी.टी. २१६३ या बसला धडकली. या बसमध्ये जवळपास ७० प्रवासी होते. त्यानंतर कावीकडे जाणारी बस रस्त्याखाली उतरली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जिंतूर आगारात नादुरुस्त बसेसचा भरणा
मागील १० वर्षापासून जिंतूर आगाराला एकही नवीन बस उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यातच एस.टी. महामंडळाने भरमसाठी तिकीट वाढ केली आहे. दुसरीकडे जिंतूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील खिळखिळे रस्त्यामुळे प्रवास अवघड झाला आहे. अशातच जिंतूर अगारांत अनेक भंगार बसेस असल्याने प्रवाशांना व वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावे लागत असून याकडे वरीष्ठ अधिकारी लक्ष देणार का असा सवाल केल्या जात आहे.